Latest

पवन मावळात भात पेरणीस वेग; शेतकर्‍यांची वाढली लगबग

अमृता चौगुले

शिरगाव : पुढारी वृत्तसेवा

गेले तीन ते चार दिवसापासून वातावरणात बदल झाल्याने कोणत्याही क्षणी पावसाच्या सरी कोसळतील असे चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पवन मावळातील शेतकर्‍यांची शेतात भाताचे रोप (दाड) टाकण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

पवन मावळातील शिरगाव, गहुंजे,दारुब्रे,साळुंबे्र, सांगवडे या भागात शेतकरीवर्ग शेतात राबताना दिसून येत आहे. येत्या दोन, तीन दिवसात पाऊस पडल्यास पेरणीस वेग येईल; मात्र सध्या अनेक शेतकरी पावसाची वाट न बघता नदी किंवा विहिरीच्या पाण्यावर भात (दाड) टाकण्याच्या कामात व्यस्त झाले असल्याचे चित्र पवन मावळात दिसून येत आहे; तसेच रानात दाड टाकून त्याच दिवशी पाऊस आल्यास ते बी जमिनीत दडपण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे भविष्यात याचा परिणाम भात उत्पादनावर होतो. या कारणामुळे अनेक शेतकरी पाऊस पडण्यापूर्वी दाड टाकून ती उगवून येण्याची काळजी घेत असल्याचे चित्र आहे. रोपे उगवून आल्यानंतर पाऊस पडल्यास ते पिकासाठी पोषक ठरते. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात होवू शकते, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

पवन मावळात इंद्रायणी या लोकप्रिय वाणासोबात कोलम,आंबेमोहर,सोनम आदी वाणाचे पीक घेण्याकडेही येथील शेतकर्‍यांचा कल दिसून येतो. कृषी विभागामार्फत बियाणेही लवकर उपलब्ध झाले आहे. शिवाय पेरणीपूर्व मशागती काही शेतकर्‍यांच्या जवळपास उरकल्या आहेत. मागील वर्षीचा अनुभवानुसार यावर्षी लवकर भात पेरणी करून पहिलाच पाऊस चांगला पडल्यास पेरणी नंतरच्या मशागती करण्यास चांगला वेग येईल, असे शेतकरी सांगतात. त्यामुळे यावर्षी मागील तीन दिवसांपासून या भागातील शेतकरी दाड करण्याच्या लगबगीमध्ये दिसून येत आहेत.

गहुंजे येथील शेतकरी सोमनाथ बोडके म्हणाले की, आम्ही बियाणे जमिनीत गाडले जावू नये म्हणून पावसाळ्यापूर्वी पेरणी करून घेतो. लवकर पेरणी केल्यास रोपांवर परिणाम होत नाही; तसेच रोपांचे आरोग्यही चांगले राहते. यंदा आम्ही विहिरीच्या पाण्यावर पेरणी केली आहे.

मान्सूनपूर्व भाताच्या बियाणांची पेरणी करणे ही मावळातील पारंपरिक पद्धत आहे.त्यामुळे जास्त बियाणे लागते, शिवाय भात लावताना दोन रोपांमधील अंतर आपण योग्य राखू शकत नाही. याचा परिणाम उत्पादन आणि पिकाची रोगप्रतिकार क्षमता यावर होतो; परंतु आता सगुणा भात पीक पद्धत आहे; तसेच गादी वाफ्यावर भातलावणी पद्धत आहे. याही पद्धतींचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा, त्यामुळे भात पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.
– निकिता तारडे, कृषी सहाय्यक

https://youtu.be/7KwsutS10qQ

SCROLL FOR NEXT