पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई बँक निवडणुकीतील बोगस मजूर प्रकरणी दुसऱ्यांदा भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी दरेकर रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात आज (सोमवार) दाखल झाले आहेत. दरम्यान दरेकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना ११ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. दरेकर यांच्याविरुद्ध एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँक मजूर प्रकरणात मुंबई पोलिसांनी दरेकर यांना दुसऱ्यादा नोटीस बजावली होती.
प्रवीण दरेकर हे गेल्या सोमवारी (दि. ३) रोजी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहिले होते. या चौकशी दरम्यान त्यांच्यावर दबाव असल्याने त्यांच्याकडून ठोस माहिती मिळाली नव्हती. यामुळे पोलिसांनी त्यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले असल्याचे सांगितले जात आहे.
आम आदमी पार्टीच्या वतीने प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर दरेकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या चौकशीला सुरूवात केली आहे.
हेही वाचलंत का ?