Latest

Postpone periods : सणात मासिक पाळी टाळण्‍यासाठी गोळ्या खाताय? जाणून घ्‍या आराेग्‍यावर हाेणारे परिणाम

सोनाली जाधव

"तुझी अडचण येण्‍याची तारीख जवळ आलीय का? सणासुदीचे दिवस आहेत आता अडचण नको. पाळी टाळण्‍यासाठी गोळ्या आताच घेवून ठेव", हा संवाद आहे दोन महिलांमधील. काहींनी कधी तरी हा संवाद आपल्‍या घरात हा ऐकलाही असेल. सणासुदीचे दिवस आले की, महिलांना सर्वात तणाव असतो तो मासिक पाळीच्‍या तारखेचा. पूर्वी एकत्र कुटुंब पद्‍धतीमध्‍ये एकीला दुसरी महिला मदतीला असायची; पण आता कुटुंब चौघांचं झालं आहे. त्‍यामुळे सणासुदीच्‍या दिवसांमध्‍ये येणारी पाळीची तारीख हा महिलांसाठी मोठा तणावाचा विषय झाला आहे. यातूनच पाळी लांबणीवर पडण्‍यासाठीच्‍या गोळ्या घेण्‍यास सुरुवात झाली. जाणून घेवूया या गोळ्याचा महिलांच्‍या आरोग्‍यावर होणार्‍या परिणामांविषयी… (Postpone periods)

सण किंवा एखादा कार्यक्रम तोंडावर आला आहे, आणि मासिक पाळीची तारीखही त्याचदरम्यान आहे". "आता काय करायचं" य़ा चिंतेने अस्वस्थ झालेली महिला तुम्ही पाहिली असेल. आपल्याला या दिवसांमध्ये कमीपणाची भावना वाट्याला येवू नये, या सण, कार्यक्रमात इतर महिलांसारखे आपल्यालाही सहभागी होता यावं म्हणून मासिक पाळी पुढे ढकल्यासाठी गोळ्या घेतल्या जातात. या गोळ्या खाणं म्हणजे महिलांनी त्‍यांच्‍या आरोग्यावर केलेले एकप्रकारचा अन्यायच. मासिक पाळी पुढे ढकल्यासाठी गोळ्या हा तात्पुरता मार्ग असला तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम होत असतात. (Postpone periods )

संबधित बातम्या

आजही आपल्याकडे मासिक पाळीकडे संकुचित नजरेने पाहिले जाते. मासिक पाळीतील रक्त अशुद्ध, मासिक पाळी आलेली महिला म्हणजे अपवित्र. तिने देवपुजा करु नये, तिने प्रसाद करु नये अस वातावरण आणि गैरसमजुती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. बऱ्याच महिलांना स्व:लाही असं वाटतं असतं. परिणामी महिला आपल्याला सण समारंभ, देवपूजा करता यावी म्हणुन मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या खातात. यामुळे हार्मोन्समध्ये बदल होवून मासिक पाळी पुढे ढकलते.

आजही आपल्याकडे मासिक पाळी संदर्भात अंधश्रद्धा पाहायला मिळतात. उदा. मासिक पाळी दरम्याने तिने वेगळे बसणे, देवपूजा न करणे.

Postpone periods : ते कमीपणाच वाटायच….

याविषयी खासगी नोकरी करणाऱ्या पल्लवी सांगतात, "मी समारंभाच्या वेळी नाही मात्र, सणांच्या निमित्याने बऱ्याचदा पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या खाल्या आहेत. सण समोर आला की, घरातील सगळ्या नियोजनाबरोबर आपली पाळीची तारीख या सणामध्ये आहे का? हे कटाक्षाने पाहणं आले, आणि, जर अस असेल तर, ते कमीपणाच वाटायच. कारण, माझ्या बरोबरच्या सगळ्या स्त्रीया या सणांमधे सहभागी होत असताना मला मात्र वेगळ बसावं लागणार, घरात कशालाही हात लावायचा नाही यामुळे मनात एक भीती, चिंता असायची. मग हे सगळ करण्यापेक्षा गोळ्या खाणं हे योग्य वाटायच. म्हणजे, सगळे प्रश्नच मिटतात. पण, हे सगळ करत असताना माझ्या शरीरावर किती वाईट परिणाम होतो. याचा विचार मी कधीच केला नाही, पाळी येणं हे कमीपणाच लक्षण आहे, अस वाटायच. आता विचारात सुधारणा झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे, आपणच आपल्याला जुन्या विचारांमध्ये, गोष्टींमध्ये स्वतःला बंदीस्त करून घेतलयं याची जाणीव झाली. आता मी गोळ्या खात नाही.

या गोष्टी मला पटतच नाही, पण…

स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या पुजा सांगतात, सण वैगरे आले की मी आता पर्यंत कधीच  गोळी खालेली नाही. मला मुळात सण-कार्यक्रमाच्या दरम्यान पाळी आल्यास कशाला हात लावायचा नाही, नैवेद्य करे पर्यंत तिथे जायचे नाही. मुळात या गोष्टी मला पटतच नाही. मी गोळी घेणार नाही यासाठी मला माझ एक कारण मिळाले आहे. ते म्हणजे माझी 'अनियमित पाळी'. त्यामुळे पाळीची तारीखही बदलते. गोळी न घेण्यासाठी मी नेहमी हेच कारण पुढे करते. जर सणांच्या दरम्यान पाळी आल्यास मी  मुलांचा अभ्यास घेणे किंवा माझी काम करत बसते. खऱतर हे मला पटत नाही पण घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींच्यामुळे काही गोष्टी पाळाव्या लागतात. पुढे बोलत असताना त्या सांगतात की, कधी-कधी वाटत कि, पाळी आल्यावर किमान चार दिवस बाजुला बसल्याने  दररोजच्या रुटीन मधून तिला स्वत:तासाठी  वेळ मिळतो, तिला विश्रांती मिळते, पण याची खात्री आहे की येत्या काही वर्षांमध्ये पाळी आल्यानंतर महिलांना हे करु नये आणि ते करु नये सारख्या गोष्टीं बदलत जातील.

पल्लवी सांगते, माझ्या बरोबरच्या सगळ्या स्त्रीया या सणांमधे सहभागी होत असताना मला मात्र वेगळ बसावं लागणार, घरात कशालाही हात लावायचा नाही यामुळे मनात एक भीती, चिंता असायची. मग हे सगळ करण्यापेक्षा गोळ्या खाणं हे योग्य वाटायच. म्हणजे, सगळे प्रश्नच मिटतात.

Postpone periods : पाळीचे नैसर्गिक चक्र बिघडते…

मासिक पाळी अभ्यासक आणि या विषयावर महाराष्ट्रभर काम करणारे सचिन आशा सुभाष (समाजबंध संस्था) सांगतात, "मासिक पाळी ही नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे. याचा कोणत्याही देवाधर्माशी कसलाही संबंध नाही. पाळी सुरू असलेल्या महिलेला अपवित्र समजून पवित्र सण समारंभापासून तिला दूर ठेवणे हे जसे चुकीचे आहे तसेच सणावाराला पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या खाणे देखील चुकीचे आहे. या गोळ्या खाल्ल्याने शरीरातील पाळीचे नैसर्गिक चक्र बिघडते आणि पाळी अनियमित व्हायला सुरुवात होते. शरीरातील हार्मोन्सचा समतोल बिघडून गर्भधारणा होण्यास अडचण, गर्भाशयाच्या विविध आजारांचे कारण या गोळ्या ठरतात. त्यामुळे दोन दिवसांच्या सणवारासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याशी आणि आयुष्याची खेळ करून घेऊ नये. श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. पाळीचा संबंध देवाशी, सणांशी जोडणे ही अंधश्रद्धा आहे."

Postpone periods

विवाहित महिलांचे प्रमाण अधिक

ग्रामीण भागात मेडिकल स्‍टाेअर चालवणार्‍या कल्पना सांगतात,  ग्रामीण भागात पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्याचे प्रमाण जास्त आहे. बहुतांश सण,समारंभ किंवा महत्त्वाचा कार्यक्रम असेल तर गोळ्या घेतल्या जातात. गोळ्या घेण्यासाठी बऱ्याचवेळा महिलाच येत असतात. त्या बहुतांशवेळा डॉक्टरांच प्रिस्क्रिपशन आणत नाहीत.  पेशाने  फार्मासिस्ट असलेली आणि या क्षेत्रात ३ वर्षे शहरात काम करणार्‍या लरिना म्हणतात, पाळी पुढे ढकल्यासाठी गोळ्या घेण्याच प्रमाण अविवाहित महिलांच्या तुलनेत विवाहित महिलांचे प्रमाण अधिक आहे. आणि त्या क्वचित प्रसंगी गोळ्या घेत असताना डॉक्टरांचा सल्ला घेतात.

पाळी चुकविण्‍यासाठी गोळ्या घेणे  निसर्गाविरोधात

गृहिणी असलेली रेश्मा सांगतात, "मासिक पाळी येणे ही नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला २८ / ३० दिवसांच्या अंतराने पाळी येते. पाळी पुढे ढकलणे त्यासाठी गोळ्या खाणे म्हणजे निसर्गाच्या विरोधात जाणे. आपण निसर्गाच्या विरोधात गेलो तर निसर्गही आपल्या आरोग्याच्या विरोधात जाईल. तर  वसाय करणारी प्रिया सांगते, माझ्या घरातील महिला आणि मी कधीही मासिक पाळी पुढे ढकलण्यासासाठी गोळ्या खाल्ल्या नाहीत. पण जेव्हा माझी वहिनी लग्न करुन माझ्या घरी आली.  तेव्हा ती सणसमारंभच्या दरम्यान ती गोळ्या खायची, बाजुला बसायची तेव्हा आम्ही आमच्या घरातील सर्वांनी तिला समजावुन सांगत तिच्यामध्ये मासिक पाळी बद्दल सकारात्मक बदल केला.

हे अत्यंत धोकादायक आहे…

"मासिक पाळी आल्यानंतर गोळ्या खाणं आणि ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाण हे अत्यंत धोकादायक आहे.  सण, समारंभ, कार्यक्रम आल्यानंतर मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण म्हणजे निव्वळ हार्मोन्सचा अतिरेक डोस घेण असतं. हे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे. अगदी, २०-२२ वर्षांच्या मुली पाहिल्या आहेत ज्या  गोळ्या खात असतात. आणि त्यामुळे त्यांच्या मेंदुमध्ये रक्तस्त्राव, रक्ताची गुठळी निर्माण होते.  आणि या तरुण मुलींना पॅरॅलिस अति झाल तर जीवही गमवावा लागला आहे. बऱ्यावेळा महिला ज्या गोळ्या खातात त्यावरील अटी व नियम वाचत नाहीत. त्यामध्ये बारीक अक्षरात लिहलेलं असत की, या गोळ्या खाल्ल्याने काय परिणाम होतात. या नियम आपण आपल्या सोईनुसार दुर्लक्ष करतो. कोणत्याही अंधश्रद्धेपोटी जर आपण आपल्या आरोग्याशी खेळत असू, तर ते अत्यंत चुकीच आहे. विज्ञान स्वीकारायला हवं. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्यावे.

डॉ. ज्योत्स्ना देशमुख (एमडी, डीजीओ, सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर)

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT