पीएमएस म्हणजे काय गं ताई? मासिक पाळीच्या आधी…   

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

वाढत्या वयानुसार, प्रत्येक मुलीत हॉर्मोनल चेंजेस येतात. त्यामुळे प्रीमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम (PMS) ची समस्यादेखील वाढते. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स जर्नल PLosONE मध्ये सन २०१७ रोजी पीएमएसवर एक रिसर्च पब्लिश करण्यात आले होते. यामध्ये म्हटले होते की, जवळपास ९० टक्के महिला पीएमएसच्या अनुभवातून जातात. तर ४० टक्के महिला या काळात तणावात असतात. तर २ ते ३ टक्के लोक तणावाचे शिकार होतात. त्याचा परिणाम त्यांच्या सामान्य जीवनशैलीवर होतो. 

प्री-मेन्स्ट्रूअल सिंड्रोम किंवा पीएमएस काय आहे? एखाद्या महिलेच्या मासिक पाळीच्या काही दिवस आधी शरीरात, भावनात्मक आणि मानसिकरित्या बदल घडतात. जसे स्तन दुखणे, कठीण होणे, पायात गोळे येणे, पेटके येणे, मनःस्थिती बदलणे आणि डोकेदुखी होणे यासारखी लक्षणे दिसतात. जीवनशैलीतील बदल आणि औषधे घेऊन पीएमएसपासून मुक्त होण्यास मदत होते. 

मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. महिलांच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा भाग असून जेव्हा मासिक पाळी जवळ येते, तेव्हा काही लक्षणे महिलांमध्ये आढळतात. खासकरून महिलांच्या स्तनांमध्ये काही बदल दिसतात. पाळी झाल्यानंतर काही दिवस बहुतांशी महिलांसाठी कठीण काळ असतो. हे जर तुमच्यासोबत होत असेल तर हे प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोम (PMS) असू शकते. जर तुम्ही पीएमएस अनुभवत असाल तर यासाठी काही उपायदेखील आहेत.

पीएमएस असा एक समूह आहे, जे अनेक स्तरावर आपल्यावर परिणाम करतं. हे परिणाम शारीरिक, भावनात्मक किंवा स्वाभाविक असू शकते. पाळी येण्याच्या १ ते २ आठवडे आधी हे बदल घडून येतात. पाळी आल्यानंतर हे बदल दिसणं तत्काळ बंद होतं.

काय आहे पीएमएस?

प्रीमेंस्ट्रुअल स्ट्रेसमध्ये कोणत्याही महिलेला मासिक पाळी सुरु होण्याच्या ४ ते ५ दिवसआधीचा वेळ असतो. या सिन्ड्रोमने त्रस्त महिलेच्या वर्तणुकीत बराच बदल होतो. काही महिलांना काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होते. किंवा खूप राग आणि चिडचिड होते. अनेकदा तर महिलांच्या मनात आत्महत्यासारखे विचारदेखील येऊ लागतात. याविषयी डॉक्टर्स म्हणतात की, महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे पीएमएस होत असल्यास त्यांना शरिरात वेदना होतात. खासकरून स्तन किंवा पोटात या वेदना असतात. तर अनेक मुलींचे मूड अचानक बदलतात. त्या कधी कधी खूप रागात असतात. तर कधी कधी छोट्या गोष्टीवर हसतात. 

लक्षणे –

प्रत्येक महिन्याला किमान एक लक्षण तरी पाळी येण्यापूर्वी दिसू शकते. पण, प्रत्येकालाचं हे अनुभव येतील, असे नाही. काही जणींना पाळी येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही अतिशय ओटी-पोटात दुखणे, कंबर-पाठीत कळा येणे, चक्कर येणे, पाय दुखणे असे प्रकार होतात. पण, काही जणींना फार त्रास जाणवत नाही. तर काही स्त्रियांना अजिबात दुखणे होत नाही. काही लक्षणे वगळता काही स्त्रिया खूप सहजपणे वावरतात किंवा पाळी झाल्यानंतरदेखील त्यांना त्रास होत नाही. जसे आपण मोठे होऊ, तसे हे बदल बदलत जातात. कधी भावनिकरित्या काही स्त्रिया माासिक पाळी येण्यापूर्वी निराश होतात. काही वेळा तणावात  असलेल्या दिसतात. हे बदल भावनात्मक पातळीवर होतात. पण, पाळी येण्यापूर्वी अगदी कमी लक्षणे दिसल्यास हे पीएमएस आहे की नाही, ओळखणे कठीण जाते.  

हे बदल नियमित आपल्या आयुष्यात येतात का?

पीएमएसमुळे कामावर किंवा कुटुंबात किंवा मित्रांमध्ये वावरताना अडचणी येतात का? असा प्रश्नही पडतो. जर आपण 'होय' असे उत्तर दिले तर ते कदाचित पीएमएस असू शकेल. पीएमएस जाणून घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमच्या पाळीच्या कालावधीच्या ५ दिवस आधी सलग ३ महिने ही लक्षणे दिसल्यास पीएमएस असेल.  

पीएमएसच्या अनुभवातून जात असताना अनेक जणी गोड पदार्थ- जसे चॉकलेट वगैरे आणि खारट पदार्थ खातात. पण, यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहेत. या काळात अन्य महिलांना भूख लागत नाही. किंवा त्यांचे पोट खराब होऊ शकते. तसेच सूज येणे किंवा बध्दकोष्ठता यासारखे प्रकारदेखील घडू शकतात. 

पीएमएसमधून सुटकेसाठी अनेक मार्ग आहेत. तुम्ही तुमच्या आहारात बदल घडवू शकतात. पूर्ण झोप आणि व्यायाम करू शकता. तुम्ही तुमचे मन आणि शरिराला आराम देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी याविषयी चर्चादेखील करू शकता.

पीएमएस अनेक पध्दतीने दिसून येते. भावनिक, शारिरीक पातळीवर असे त्याचे स्वरूप असू शकते. परंतु, बहुतांशी महिलांमध्ये याची काहीचं लक्षणे आढळतात. सर्वच लक्षणे आढळत नाहीत. पीओमएसमध्ये पाळी येण्याआधी स्तन कोमल होणे, पायात गोळे येणे, पेटके, मनःस्थिती बदलणे आणि डोकेदुखी अशा गोष्टींचा समावेश आहे. अशावेळी जीवनशैलीत बदल करून आणि योग्य ऐषधे घेतल्यास पीएमएसपासून सुटका मिळू शकते.

शारिरीक लक्षणे – Physical signs

पोट फुगणे 

पेटके येणे

स्तन दुखणे

भूक लागणे किंवा कमी होणे

डोकेदुखी

स्नायू वेदना

सांधे दुखी

हात पाय सुजणे

मुरुम येणे

वजन वाढणे

बद्धकोष्ठता किंवा अतिसार

भावनिक लक्षणे – Emotional signs

तणाव किंवा चिंताग्रस्त

उदास राहणे

रडणे

मूड स्विंग्ज

झोप न लागणे

एकटे राहण्याची इच्छा होणे

भावूक होणे

संतप्त होणे, राग येणे

स्वाभाविक बदल – Behavioral signs 

विसराळूपणा

लक्ष कमी होणे

कंटाळा येणे

कारणे –

पीएमएस सामान्य गोष्ट आहे. पण, तुम्ही जर या पुढील गोष्टी पाळल्या नाहीत तर पीएमएस अधिक प्रभावी ठरू शकते. यामध्ये धुम्रपान करणे, खूप तणावात असणे, व्यायाम न करणे, पूर्ण झोप न घेणे, खूप मद्यपान करणे, मीठाचा अधिक वापर, लाल मांस, वा साखरचे अधिक सेवन करणे, या गोष्टींचा समावेश आहे.

तुम्ही यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करू शकता?

पीएमएस नियंत्रणात आणण्यासाठी अनेक मार्ग आहेत. यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत.

– ३० मिनिटे व्यायाम करणे

– सकस आहार घ्यावा. जसे-सर्व कडधान्ये, फळे आणि भाज्या

– अन्नांमधून कॅल्शियम मिळवण्याचा प्रयत्न करा. (डेअरी, हिरव्या पालेभाज्या)

– मीठ, कॅफिन आणि अल्कोहोल टाळा.

– धूम्रपान करू नका.

– भरपूर झोप घ्या.

– तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

– आपली मनस्थिती आणि लक्षणे जाणून घ्या.

काही महिला फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी -६, व्हिटॅमिन ई, आणि कॅल्शियमसह व्हिटॅमिन डी घेतात. जर आपण हे विटॅमिन्स घेत असाल तर आपण आपल्या डॉक्टरांना विचारून सुनिश्चित करा की, हे विटॅमिन्स अथवा सप्लिमेंट किती सुरक्षित आहेत.

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news