Latest

Ganeshotsav 2023 : पुण्यातील गणेशोत्सवात ‘आरोग्यसेवा आपल्या दारी’; वैद्यकीय सेवांसाठी 75 राइडर्स सज्ज

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट, श्री गजलक्ष्मी ट्रस्ट आणि आम्ही पुणेकर संस्था यांच्या वतीने आणि रायडर्स ऑफ दख्खन यांच्या सहकार्याने 75 रायडर्स गणेशोत्सवात वैद्यकीय सेवेसाठी सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवात गर्दीच्या विविध ठिकाणी 40 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही, तिथे दुचाकीस्वार वैद्यकीय सुविधा देणार आहेत. 'आरोग्यसेवा आपल्या दारी'अंतर्गत या अभियानाचा प्रारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फरासखाना पोलिस स्टेशन येथून झाला.

या वेळी पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल, तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विकास पवार, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, नितीन पंडित, गजलक्ष्मी ढोल-ताशा पथकाचे प्रमुख केतन देशपांडे, साई सामाजिक सेवा संस्थेचे श्रीनिवास काबरा, संदीप खर्डेकर उपस्थित होते. डॉ. प्रियांक जावळे, विठ्ठल बोडखे, नानासाहेब ओव्हाळ, डॉ. सुनील केलगणे, डॉ. स्वप्नाली जेंगते, विशाल रेड्डी, राम झाकडे, सत्यवान लंगर यांची टीम उपक्रमात सक्रिय कार्यरत राहणार आहे.

महापालिकेकडून जीवरक्षक तैनात

महापालिकेच्या वतीने स्वच्छता कर्मचार्‍यांसह विसर्जन व्यवस्था, मूर्तीसंकलन केंद्र, विसर्जन ठिकाणी जीवरक्षकांची नियुक्ती, स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
गणेशोत्सवासाठी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले असून, गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या इतर शहरांसह देशभरातून गणेशभक्त शहरात येतात. या गणेशभक्तांना सोयींसाठी महापालिकेने तयारी केली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे उत्सवाच्या कालावधीत 400 फिरती स्वच्छतागृहे असणार आहेत. यंदा विसर्जनासाठी 42 बांधीव हौद, 265 ठिकाणी 568 लोखंडी टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 252 ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्र आणि दान केंद्र उभारण्यात आली आहेत. कृत्रिम हौद, लोखंडी टाक्यांच्या ठिकाणी 256 निर्माल्य कलशांची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय तिसर्‍या दिवसापासून 150 फिरते हौदही गणपती विसर्जनासाठी उपलब्ध राहतील. सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन वाघोली येथील खाणीमध्ये केले जाणार आहे. उत्सवाच्या काळात रस्ते, मोकळ्या जागा, कचरा टाकण्याच्या जागा, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौदांची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत, असे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
मुठा नदीपात्रालगत असणार्‍या विसर्जन घाटांवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशामक दलाकडील प्रत्येकी एक फायरमन दुपारी एक ते रात्री नऊ या वेळेत आणि प्रत्येकी दोन जीवरक्षक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असतील.

अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती

शहरातील 1 हजार 183 सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती टॉयलेटसेवा या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. टॉयलेट सेवा अ‍ॅपमध्ये पत्ता टाकून त्या भागातील स्वच्छतागृहे शोधता येणार आहेत. तसेच सशुल्क सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये क्यू-आर कोडची सुविधाही देण्यात येणार आहे.

आपत्कालीन संपर्क
020-255-1269
020-25506800 (1/2/3/4)

गणेश सोनुने : आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी : 9689931511
देवेंद्र पोटफोडे : अग्निशामक प्रमुख- 8108077779, 020-26451707
अग्निशामक दल : 101

हेही वाचा

SCROLL FOR NEXT