Latest

Raju Shrivastava Tribute : ते खूप लवकर आपल्यातून निघून गेले; पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली

स्वालिया न. शिकलगार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर गेल्या ४२ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेले प्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव (Raju Shrivastava Tribute) यांचे बुधवारी येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५८ वर्षे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. (Raju Shrivastava Tribute)

राजू श्रीवास्तव यांनी आमचे जीवन हास्य, विनोद आणि सकारात्मकतेने उजळ केले. ते खूप लवकर आपल्यातून निघून गेले. पण त्यांच्या अनेक वर्षांच्या अप्रतिम कार्यामुळे ते असंख्य लोकांच्या हृदयात जिवंत राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना. ओम शांती, असे पंतप्रधान मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

काही राजकीय नेत्यांची भेट घेण्यासाठी मागील ऑगस्ट महिन्यात राजू श्रीवास्तव दिल्लीला आले होते. ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते, तेथील जिममध्ये व्यायाम करीत असताना श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला होता. त्यानंतर त्यांना तातडीने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचारांची शर्थ करुनही ते ४२ दिवसांपासून कोमातून बाहेर येऊ शकले नव्हते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकविण्यात आला होता. अखेर बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

राजू श्रीवास्तव यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर येथे २५ डिसेंबर, १९६३रोजी झाला होता. लहानपणी त्यांचे नाव सत्यप्रकाश असे होते. नंतर त्यांना राजू या टोपणनावाने बोलाविले जात असे. पुढे हेच नाव रुढ झाले. लहानपणापासूनच राजू श्रीवास्तव यांना मिमिक्री आणि कॉमेडी करण्याची आवड होते. दूरचित्रवाहिनीवरील दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाद्वारे त्यांचे देशभरात नाव झाले. राजू यांचे लग्न १९९३ साली झाले होते. त्यांना दोन मुले आहेत.

श्रीवास्तव यांनी राजकारणातही आपले नशीब आजमावले होते. २०१४ साली समाजवादी पक्षाने कानपूर लोकसभा मतदारसंघात त्यांना तिकीट देण्याची तयारी दर्शवली होती. पण, निवडणूक लढविण्यास त्यांनी नकार दिला होता. यानंतर ते भाजपमध्ये सामील झाले होते. स्वच्छ भारत अभियानावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे नामांकन केले होते. यानंतर देशाच्या विविध भागात श्रीवास्तव यांनी स्वच्छ भारत मोहिमेचा प्रचार केला.

२०१९ साली श्रीवास्तव यांना उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष बनविण्यात आले होते. राजकारण आणि कला क्षेत्रात कार्यरत असूनही राजू श्रीवास्तव आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असत. दररोज ते जिममध्ये व्यायाम करीत असत. सोशल मीडियावरही ते सक्रिय होते. चाहत्यांना हसवत राहणे हे त्यांनी कर्तव्य मानले होते. त्यांच्या इन्स्टाग्राफ अकाऊंटवर हसविणार्‍या अनेक व्हिडिओज पहावयास मिळतात.

SCROLL FOR NEXT