नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आज (दि. ९) संबाेधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) पक्षातील घराणेशाहीवर हल्लाबाेल केला. तसेच शरद पवार पंतप्रधान का झाले नाहीत, याचे कारणही सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील एनडीएच्या खासदारांसोबतच्या बैठकीवेळी सांगितले की, काँग्रेसमधील घराणेशाहीमुळे शरद पवार हे पंतप्रधान हाेवू शकले नाहीत. पंतप्रधान झाल्यानंतर मी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले की, पहिल्यांदाच तुमच्या पक्षाने तुम्हाला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आणि तुमच्या नावावर पूर्ण बहुमत मिळवले. पण काँग्रेसच्या कुटुंबवादामुळे शरद पवारांना पंतप्रधान होऊ दिले नाही,असेही मोदी म्हणाले.
गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर पंतप्रधान मोदींची ही टिप्पणी आली आहे. २ जुलै रोजी अजित पवार आणि पक्षाचे इतर ८ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाले. अजित यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या महिन्याच्या सुरुवातीला शरद पवार यांनी पुण्यातील टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान मोदींसोबत मंच शेअर केला होता. पवार यांच्या उपस्थितीने विरोधकांमध्ये खळबळ उडाली होती. विशेषत: शरद पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस 'इंडिया' गटाचा (Pm Modi on Sharad Pawar) भाग आहे.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावर पंतप्रधानांनी निशाणा साधला. ते म्हणाले, भाजपने त्यांच्याशी युती तोडलेली नाही. विनाकारण वाद निर्माण केला गेला. शिवसेना २०१४ पासून युतीमध्ये होती आणि त्यांच्या सामनामधून नेहमीच आमच्या सरकारवर हल्ला केला जात आहे. आम्ही ते सहन केले. कधीकधी आम्ही हे हलक्यात घेतली. एकीकडे तुम्हाला सत्तेत रहायचे आहे तर दुसरीकडे तुम्हाला टीका करायची आहे. या दोन गोष्टी एकत्र कशा होऊ शकतात? महाराष्ट्रातील २०१९ च्या राजकीय वादाच्या संदर्भात पंतप्रधानांचे हे वक्तव्य आले आहे.
ज्यांनी सत्तेत असताना चुकीची कामे केली आहेत त्यांची तिकिटे मी रद्द केली आहेत. तसेच निवडणुकीच्या प्रचारामुळे झालेल्या चुकीबद्दल माफीही मागितली आहे, असेही पंतप्रधान मोदींनी एनडीएच्या खासदारांशी बोलताना सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूला (43) भाजप (74) पेक्षा कमी जागा मिळाल्या, होत्या, त्यानंतरही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. पुढे पंतप्रधान मोदी यांनी एनडीए आघाडीतील आपले मित्रपक्ष महत्त्वाचे आहेत यावरही भर दिला. सर्वजण एकत्र राहिले तरच आदर मिळेल. आपण एकत्र निवडणुका लढवू आणि जिंकू. एनडीएमध्ये जे काही पक्ष सामील होतात त्यांचे स्वागत आहे, असेही पीएम मोदी यांनी स्पष्ट केले.