Latest

PM Modi Ayodhya Visit : अयोध्या संपूर्ण उत्तर प्रदेशच्या विकासाला दिशा देईल : पंतप्रधान नरेंद्र माेदी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : "संपूर्ण जग २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. आज केवळ रामलल्लालाच पक्के घर मिळालेले नाही तर देशातील ४ कोटी गरीब जनतेलाही पक्के घर मिळाले आहे. आजचा भारत आपल्या तीर्थक्षेत्रांचे सुशोभीकरण करत आहे आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या जगातही मग्न आहे. आगामी काळात अयोध्या संपूर्ण उत्तर प्रदेशच्या विकासाला दिशा देईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज (दि.३०) अयोध्येत विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या इतिहासात ३० डिसेंबर ही तारीख अत्यंत ऐतिहासिक ठरली आहे. १९४३ मध्ये या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये ध्वज फडकावला आणि भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. आज, स्वातंत्र्य चळवळीशी निगडित अशा एका शुभदिनी आपण स्वातंत्र्याच्या अमर युगाचा संकल्प पुढे नेत आहोत. आज विकसित भारताच्या उभारणीला गती देण्याच्या मोहिमेला अयोध्या शहरातून नवी ऊर्जा मिळत आहे. आज येथे १५ हजार कोटींहून अधिक रकमेच्या विकासकामांची पायाभरणी व उद्घाटन करण्यात आले. पायाभूत सुविधांशी संबंधित या कामांमुळे पुन्हा एकदा आधुनिक अयोध्या देशाच्या नकाशावर अभिमानाने प्रस्थापित होईल. जगात कोणताही देश असो, त्याला विकासाची नवी उंची गाठायची असेल तर त्याचा वारसा जपलाच पाहिजे. आपला वारसा आपल्याला प्रेरणा देतो, आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. त्यामुळे आजचा भारत जुना आणि नवा या दोन्ही गोष्टी आत्मसात करून पुढे जात आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आज देशाने आधुनिक रेल्वे बांधणीच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. वंदे भारत आणि नमो भारत नंतर आज देशाला आणखी एक आधुनिक ट्रेन मिळाली आहे. या नव्या ट्रेनला अमृत भारत असे नाव देण्यात आले आहे. वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत ट्रेनची ही त्रिमूर्ती भारतीय रेल्वेला नवसंजीवनी देणार आहे. सध्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाची १०-१५ हजार लोकांना सेवा देण्याची क्षमता आहे. स्टेशनचा पूर्ण विकास झाल्यानंतर अयोध्याधाम रेल्वे स्थानकावर दररोज ६० हजार लोक ये-जा करू शकतील, असे ते म्हणाले.

त्रिकालदर्शी महर्षी वाल्मिकीजींच्या नावाने अयोध्या धाम विमानतळाचे नाव या विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आशीर्वाद देईल. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण हे ज्ञानाचा मार्ग आहे जो आपल्याला भगवान श्री रामाशी जोडतो. आधुनिक भारतात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्या धाम आपल्याला भव्य-दिव्य नवीन राम मंदिराशी जोडेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT