Latest

मोदी सरकारच्या PLI योजनेला मोठे यश, Apple कडून भारतात दीड वर्षात १ लाख नोकऱ्यांची निर्मिती

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्राने ऑगस्ट २०२१ मध्ये प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह प्रोत्साहन (पीएलआय) योजना लागू केली होती. या योजनेमुळे देशात नोकऱ्यांच्या निर्मितीला चालना मिळाली आहे. Apple ने गेल्या १९ महिन्यांत १ लाख थेट नोकऱ्यांची निर्मिती केली आहे. यासह Apple ही देशातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सर्वाधिक रोजगार निर्माती करणारी कंपनी म्हणून उदयास आली आहे.

Foxconn, Wistron आणि Pegatron हे भारतातील Apple च्या iPhones चे प्रमुख कंत्राटी उत्पादक आहेत. या तीन कंपन्यांनी मिळून सुमारे १.५ लाख नोकऱ्यांपैकी ६० टक्के नवीन नोकर्‍या निर्माण केल्या असल्याचे वृत्त बिझनेस स्टँडर्डने दिले आहे. शिवाय, त्यांनी ७ हजार नवीन नोकऱ्या निर्माण करून पीएलआय योजनेंतर्गत त्यांची दुसऱ्या वर्षाची वचनबद्धता आधीच सिद्ध केली आहे. तर सनवोडा, एव्हरी, फॉक्सलिंक आणि सॅलकॉम्प हे Apple चे पुरवठादार असून ज्यांनी ४० हजार नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, असेही वृत्तांत पुढे म्हटले आहे.

PLI योजनेंतर्गत, प्रत्येक लाभार्थ्याने इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला तिमाही आधारावर नोकरीचा डेटा सादर करणे आवश्यक आहे. तामिळनाडूत असलेली Foxconn Hon Hai कंपनी केवळ भारतात आयफोन बनवते. या कंपनीने ३५ हजारांपेक्षा जास्त नोकर्‍या निर्माण केल्या आहेत. दरम्यान, तामिळनाडूत असलेली आणखी एक दुसरी कंपनी पेगाट्रॉनने १४ हजार नोकऱ्यांची निर्मिती केली. तर कर्नाटकमध्ये असलेल्या विस्ट्रॉनने १२,८०० नोकऱ्यांची संधी निर्माण केली असून ही कंपनी रोजगार निर्मितीत तिसऱ्या स्थानी आहे.
६ ऑक्टोबर २०२० रोजी केंद्र सरकारने स्मार्टफोन PLI योजना जाहीर केली होती. तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील प्रत्येक नवीन थेट नोकरीमुळे सुमारे तीन अप्रत्यक्ष नोकर्‍या निर्माण होतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. २०२१ च्या आर्थिक वर्षात Apple ने PLI योजनेअंतर्गत पहिल्या वर्षात ११ हजार कोटी रुपयांचे iPhones निर्यात केले होते.

तज्ज्ञांच्या मते Apple भारतात विकल्या जाणार्‍या फोनपैकी ८५ टक्के फोनचे उत्पादन देशांतर्गत घेते. PLI योजना सुरू होण्यापूर्वी कंपनी चीनमधून जवळपास ९० टक्के फोन आयात करत होती.

पियूष गोयल यांचे ट्विट

PLI योजनेमुळे भारतात रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे. मोदी सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत Apple ने सुमारे १.५ वर्षांत १ लाख नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, असे ट्विटदेखील केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT