Latest

सोलापुरात पिटबुलचा तरूणावर जीवघेणा हल्‍ला; शरीराचे लचके तोडले, तरूण गंभीर जखमी

निलेश पोतदार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा शहरील एका तरुणावर 41 देशांमध्ये पाळण्यास बंदी असलेल्या पिट बुल या पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना (शुक्रवार) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेत कुत्र्याने तरुणाचे अक्षरशः लचके तोडले आहेत. सोलापुरातील लक्ष्मीनारायण टॉकीजजवळ हा प्रकार घडला. सुदैवाने हा तरुण या हल्यात बचवला. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. आसिफ उस्मान मुल्ला असे या जखमी तरुणाचे नाव आहे.

एमआयडीसी परिसरात असलेल्या लक्ष्मीनारायण टॉकीज समोर असलेल्या ईश्‍वर गारमेंटच्या आवारात गारामेंटच्या मालकाने पिट बुल प्रजातीचा कुत्रा पाळला आहे. यावेळी आसिफ मुल्ला हा कंपाउंडच्या आत गेल्यानंतर पिट बुलने त्याच्यावर हल्ला चढवला आहे. तर, हल्ला करणार्‍या या कुत्र्याने आसिफ याच्या अंगाचे अक्षरशः लचके तोडलेत. कुत्र्याच्या हल्ल्यात आसिफ गंभीर जखमी असताना ही उपस्थितपैकी कोणीही कंपाउंडच्या आत जाऊन त्याला वाचवण्याची हिंमत दाखवू शकला नाही. मात्र, आसिफ स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करत होता.

विशेष म्हणजे ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद देखील केली. मात्र, या गर्दीतून या तरुणाला वाचवण्यासाठी एकही व्यक्ति पुढे आला नव्हता. त्यामुळे या हल्ल्यात आसिफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान आसिफ मुल्ला हा कंपाउंड ओलांडून का गेला हे मात्र समजू शकले नाही.

41 देशात पिट बुल पाळण्यास बंदी……

पिट बुल प्रजातीच्या श्वान पाळण्यासाठी जगातील अनेक देशात बंदी आहे. देशात देखील उत्तरप्रदेश आणि दिल्ली सारख्या राज्यात पिट बुल पाळण्यावर बंदी आहे. प्रणिमित्रांच्या मते बिबट्यानंतर सर्वाधिक धोकादायक चावा हा पिट बुलचा मानला जातो. बाकी कुत्र्यांच्या तुलनेत पिट बुलचा चावा हा गंभीर आणि मोठा असतो. त्यामुळेच जगातील 41 देशात पिट बुल पाळण्यास बंदी आहे.

ईश्‍वर गारमेंटच्या मालकावर गुन्हा दाखल….

ईश्वर गारमेंट फॅ क्टरीच्या आवारात अमेरिकन पिटबुल या हिंस्र प्रजातीच्या कुत्र्याने तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याने गारमेंटचे मालक नितीन अंबुरे (रा. साखर पेठ) यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले. या प्रकरणी यासीन मुल्ला यांनी फिर्याद दाखल केली आहे.

परवानगी आहे का याचा तपास सुरू…..

सोलापूर शहर हद्दीत घर व व्यापार परिसराच्या संरक्षणासाठी किंवा छंद म्हणून कुत्रा पाळायचा असेल तर यासाठी महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. ईश्वर गारमेंटच्या मालकाने पिटबुल या अत्यंत हिंस्र प्रजातीचे पिल्लू पाळले आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिकेकडून परवानगी घेतली आहे की नाही हे तपासले जाईल असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT