Latest

पिंपळनेर : अंगणात कचरा का जाळला म्हणून झाली हाणामारी

अंजली राऊत

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
शहरातील एकमत नगरात अंगणात कचरा जाळल्याचा जाब विचारल्याने वाद उफाळून आला. या वादाचे पर्यवससन हाणामारीत झाले. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात परस्पर फिर्यादीनुसार पाच जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शकिर निसार फकिर (वय २९, रा.एकमत नगर,साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार (दि.९) रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शेजारी नाना यादव चौधरी याने अंगणात कचरा का जाळला असे शकिर निसार फकिर याने सांगितले. अंगणात दुचाकी असल्याने घराच्या मागच्या बाजुला कचरा जाळला असता असे शकीर यांनी सांगितले. याचा राग आल्याने नाना चौधरी याने असभ्य भाषेचा वापर करीत शिवीगाळ केली. तसेच हातात काठी घेत धावून आले. यावेळी त्यांची पत्नी मंगल चौधरी हिने मध्यस्थी करीत नाना चौधरी यांच्या हातातील काठी पकडली. नाना चौधरी याने पत्नीला धक्का दिल्याने मंगल चौधरी जमिनीवर पडल्या. यामध्ये त्यांच्या कमरेस मार लागला. या फिर्यादीवरून वरील दोघा संशयितांवर साक्री पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तर परस्पर फिर्यादीत मंगल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार (दि.९) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अंगणात कचरा जाळण्याच्या कारणावरून शाकीर शहा निसार शहा, शाहरूख शहा निसार शहा, शाहीद शहा निसार शहा यांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. शाकीर शहाने धक्का दिल्याने जमिनीवर पडून उजव्या पायात फॅक्चर झाल्याचे मंगल चौधरी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पतीसह मंगल चौधरी यांना खाजगी वाहनाने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी शकिर निसार फकिर, नाना यादव चौधरी व मंगल चौधरी या तिघांसह पाच संशयितांवर साक्री पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT