Latest

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘फुलराणी’ अवतरणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बालकवींची 'फुलराणी' म्हणजे नितांतसुंदर काव्य… महाराष्ट्राच्या कितीतरी पिढ्या या फुलराणीने फुलवल्या. त्यामुळेच मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातलेल्या 'फुलराणी' चित्रपटाविषयी उत्सुकता असणं साहजिकच होतं. चित्रपटात फुलराणी कशी असणार? आणि विशेष म्हणजे कोण असणार? याविषयी खूप उत्सुकता पहायला मिळते आहे.

चित्रपटाच्या घोषणेपासून चर्चेत असलेल्या 'फुलराणी' चित्रपटाचे एक आकर्षक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. निळ्या डेनिमच्या आकर्षक रंगसंगती केलेल्या कपड्यातील फुलांनी मढलेली, आत्मविश्वासाने मोबाईलवर बोलणारी, पाठमोरी 'फुलराणी' पहायला मिळत आहे. आजच्या जमान्यातील ही स्मार्ट 'फुलराणी' कोण? याची उत्सुकता या पोस्टरने नक्कीच वाढवली आहे.

'फुलराणी' नेमकी कोण असणार? याचा उलगडा लवकरच होणार असून येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर २२ मार्चला ही 'फुलराणी' मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. यातील विक्रम राजाध्यक्ष ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारणार आहे.

'पिग्मॅलिअन' या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली 'माय फेअर लेडी' ही म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. याच 'पिग्मॅलिअन' कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली 'फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी' हा चित्रपट साकारत आहे.

'फिनक्राफ्ट मीडिया' आणि 'अमृता फिल्म्स' चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, विश्वास जोशी, ए. राव या चित्रपटाचे निर्माते आहेत. या नव्या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT