Latest

Salman Butt PCB : पीसीबीकडून अवघ्या एका दिवसातच सलमान बटची हकालपट्टी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान बटला पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या सल्लागार पदावरून हटवण्यात आले आहे. सलमानची पीसीबीच्या निवड समितीमध्ये एक दिवस आधी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या निवडीनंतर बोर्डाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. फिक्सिंगमध्ये गुंतलेल्या एका माजी खेळाडूला निवड समितीचा भाग बनवल्याने चाहत्यांसह माजी खेळाडूंनी संताप व्यक्त केला होता. अखेर एका दिवसातच सलमानची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पीसीबीचे मुख्य निवडकर्ता वहाब रियाझने याची घोषणा केली.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची अत्यंत खराब कामगिरी झाली. त्यानंतर संघाच्या कर्णधार पदासह व्यवस्थापनात अनेक बदल करण्यात आले. दरम्यान, गेल्या शुक्रवारी (दि. 1) पीसीबीने मुख्य निवडकर्ता वहाब रियाझचा सल्लागार म्हणून सलमान बटची नियुक्ती जाहीर केली होती. यात कामरान अकमल आणि राव इफ्तिकार अंजुम यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या तिघांनी 1 डिसेंबरपासून पदभार स्वीकारला. दरम्यान, या निवडीनंतर पीसीबीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.

मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळलेल्या आणि शिक्षा भोगलेल्या खेळाडूला पीसीबीमध्ये स्थान का देण्यात दिले? असा सवाल उपस्थित करण्यात आला. माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनीही सलमान बटच्या नियुक्तीवर टीका केली होती. अखेर रियाझला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पत्रकार परिषद बोलावणे भाग पडले, जिथे त्याने बटला त्याच्या पदावरून तत्काळ काढून टाकल्याचे उघड केले.

यावेळी रियाझ म्हणाला की, 'सलमान बट कोणत्याही पीसीबी पॅनेलचा भाग नाही. माझ्या माहितीनुसार, त्याला क्रिकेटची खूप चांगली समज आहे आणि तो गेली 2-3 वर्षे देशांतर्गत क्रिकेट कव्हर करत होता. मला त्याचा सल्ला घेता यावा म्हणून त्याला माझा सल्लागार बनवण्यात आले होते. पण याचा आधार घेत काही मीडिया हाऊस आणि लोकांनी अपप्रचार सुरू केला. मुख्य निवडकर्ता या नात्याने माझ्यासोबत कोणाला काम करायचे आणि कोणाच्या पाठिंब्याची गरज आहे हे मी ठरवेन. पण लोक माझ्यावर घराणेशाही आणि मैत्रीचे आरोप करू लागले आणि त्यामुळेच मी बटला हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मी सलमानला सांगितले आहे की तो माझ्या टीममध्ये असू शकत नाही.'

सलमान बट 2010 मध्ये मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. यासाठी आयसीसीने सलमान बटवर 10 वर्षांची बंदीही घातली होती आणि त्याला लंडनमध्ये तुरुंगवासही भोगावा लागला होता.

SCROLL FOR NEXT