पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसने पत्रकार परिषदेत दिलेल्या शब्द खरा करुन दाखवला आहे. भारतीय प्रेक्षकांनी मैदान तुडुंब भरलेले असेल आम्ही सर्व प्रेक्षकांना शांत करुन दाखवू, असे पॅट कमिंस म्हणाला होता. त्याचा हा शब्द त्याने सत्यात उतरवला आहे. विश्वचषकावर सहाव्यांदा मोहर उमटवत त्याने भारतीय प्रेक्षकांमध्ये पिन ड्रॉप सायलेंस केला होता.
ऑस्ट्रेलियन संघासमोर कोणत्या भारतीय खेळाडूचे आव्हान असेल, या प्रश्नाला उत्तर देताना कमिन्स म्हणतो, "भारत हा एक चांगला संघ आहे. मोहम्मद शमी हा मोठा (धोका) आहे." क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्याच्या खेळपट्टीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कमिन्सने म्हटले की, "दोन्ही संघांसाठी हे स्पष्टपणे सारखेच आहे. आपल्याच देशात खेळण्याचे काही फायदे आहेत यात शंका नाही. पण आम्ही इथे खूप क्रिकेट खेळलो आहोत." (Pat Cummins)
"आम्ही भारतात याआधी खेळलो आहोत त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी ही काही आमच्यासाठी नवीन गोष्ट नाही. डेव्हिड वॉर्नर सारखा कोणीतरी नाचत असेल…," असे कमिन्सने अंतिम सामनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले. "हा एक समान सामना आहे. २०१५ मध्ये विश्वचषक जिंकलेल्या संघातील ६-७ खेळाडू आमच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना याचा अनुभव आहे आणि ते धाडसाने खेळतील." (Pat Cummins)