Latest

Parliament Winter Session | संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार अधिवेशन सुरू

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : संसदेचे हिवाळी अधिवेशनाला पुढच्या महिन्यात ४ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. सोमवार ४ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून, ते शुक्रवार २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या संदर्भात शनिवारी २ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने त्यांच्या X सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्वीट करत दिले आहे. (Parliament Winter Session)

संसदेच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात सरकारच्या वतीने संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या वेळी ३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या मतमोजणी होणार असल्याने एक दिवस आधी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली, असे 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Parliament Winter Session)

Parliament Winter Session | अधिवेशनात 'या' विधेयकांवर चर्चेची शक्यता

मिझोरम, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा या अधिवेशनावर मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान सरकार संसदेच्या या अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयके देखील मंजूर करण्यास उत्सुक आहे. आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायदा बदलू पाहणारी तीन महत्त्वाची विधेयके या अधिवेशनात विचारार्थ घेतली जाण्याची शक्यता आहे. कारण गृहविषयक स्थायी समितीने नुकतेच या संदर्भातील तीन अहवाल स्वीकारले आहेत. संसदेत प्रलंबित असलेले दुसरे महत्त्वाचे विधेयक मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित आहे, यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सर्व विरोधी पक्षांच्या मागणीनुसार आरक्षण संदर्भात देखील आगामी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा होण्याची अधिक शक्यता आहे, असे देखील 'इंडिया टुडे'ने म्हटले आहे. (Parliament Winter Session)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT