नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : निर्धारित कालावधीच्या एक आठवडाआधीच संसद कामकाजाचे (Parliament Winter Session) शुक्रवारी (दि.२३) सूप वाजले. संसदेचे ७ डिसेंबर रोजी सुरु झालेले हिवाळी अधिवेशन पुढील २९ तारखेपर्यंत चालणार होते. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.
हिवाळी अधिवेशात (Parliament Winter Session) लोकसभेची कामकाज उत्पादकता ९७ टक्के इतकी राहिली. तर १३ दिवसांमध्ये एकूण ६२ तास ४२ मिनिटे कामकाज चालल्याचे बिर्ला यांनी नमूद केले. लोकसभा अध्यक्षांनी कामकाज गुंडाळल्याची घोषणा केली, त्यावेळी सदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सर्व प्रमुख मंत्री आणि विरोधी गोटाच्या सोनिया गांधी व इतर विरोधी पक्षनेते उपस्थित होते.
तवांगमधील चीनी घुसखोरीच्या प्रयत्नाच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी हिवाळी अधिवेशनात मोठी राडेबाजी केली. या विषयावर चर्चा घेण्याची विरोधकांची मागणी सरकारने फेटाळून लावली. संवेदनशील विषयावर संसदेत चर्चा घेतली जाऊ शकत नाही आणि हा प्रघात तत्कालीन संपुआ सरकारच्या कार्यकाळातच पडला असल्याची भूमिका सरकारकडून घेण्यात आली होती. दरम्यान, बिहारमध्ये विषारी दारुसेवनामुळे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी भाजपच्या खासदारांनी संसद भवन प्रांगणातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी जोरदार निदर्शने केली.
हेही वाचलंत का ?