पूर्णा, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील फुकटगाच्या शेतक-यावर २ लाखाचे थकित पीककर्ज होते. त्याच्या वसुलीसाठी बँकेने तगादा लावला होता. डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर हे कर्ज कसे फेडावे? या चक्रव्युहात सापडलेल्या एका (३२ वर्षीय) तरुण शेतक-याने टोकाचे पाऊल उचलले. त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना पूर्णा तालुक्यातील फुकटगावा जवळच्या लोहमार्गावर १८ एप्रिल रोजी रात्री घडली. या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अमोल निळकंठ बोकारे (वय ३२) रा फुकटगाव ता पूर्णा असे त्या मृत शेतक-याचे नाव आहे.
मृत शेतकरी हा फुकटगाव येथे राहत असून, त्याच्याकडे असलेल्या ३ एकर शेतीत काम करुन तो उपजिवीका भागवत असे. मागील दोन ते तीन वर्षांच्या काळामध्ये अतिवृष्टी पावसाचा खंड अवकाळीमुळे शेती उत्पनात मोठ्या प्रमाणात घट झाली. परिणामी, शेतक-यांची आर्थिक परिस्थती खालावली. अमोल याने पूर्णा येथील महाराष्ट्र बॅकेकडून आपल्या शेतीवर २ लाखाचे कर्ज काही वर्षापूर्वी घेतले होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे त्याला आपले कर्ज वेळेत फेडता आले नाही. त्यातच बॅंकेने कर्जवसुलीसाठी लावलेला तगादा डोक्यावर असलेले ईतरही देणं कसे फेडावे या विंवचनेत तो होता.
गुरुवार दिनांक १८ एप्रिल रोजी रात्री त्याने टोकाचा निर्णय घेतला. गावापासुन जाणा-या लोहमार्गावरील धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना ग्रामस्थांच्या निर्देशनास आल्यावर त्यांनी तातडीनं पूर्णा पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळी सपोनि दर्शन शिंदे जमादार रमेश मुजमुले, अण्णा माने बोईनवाड, अजय माळकर यांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करत येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. हरिभाऊ भागवत बोकारे यांनी दिलेल्या खबरीवरुन शेतकरी जीवनयात्रा संपवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रमेश मुजमुले करीत आहेत.
हेही वाचा :