Lok Sabha Election 2024 : लोकशाहीचे अमृतमंथन आजपासून सुरू

Lok Sabha Election
Lok Sabha Election
Published on
Updated on

19 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू होईल. त्याचवेळी भारतीय संसदीय लोकशाहीचा महाकुंभमेळ्याचा खर्‍या अर्थाने बिगुल वाजणार आहे. सात टप्प्यातील या निवडणुकीत 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशात एकूण 543 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे रोजी 6 टप्पे पार पडल्यानंतर 1 जून रोजी सातव्या व शेवटच्या टप्प्यात प्रत्यक्ष मतदानाची सांगता होईल आणि 18 व्या लोकसभेसाठी 4 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 102 जागांसाठी मतदान होईल. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात 89 जागा, तिसर्‍या टप्प्यात 94 जागा, चौथ्या टप्प्यात 96, पाचव्या टप्प्यात 49, सहाव्या टप्प्यात 57 आणि सातव्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीसह एकूण 57 जागांसाठी मतदार राजा आपला हक्क बजावणार आहे.
पहिल्या फेरीत महाराष्ट्रातील पाच जागी मतदान होईल. राजस्थानमधील 25 पैकी 12 जागा, तामिळनाडूतील सर्वच्या सर्व 39, पुद्दुचेरीतील एकमेव जागा, उत्तर प्रदेशमधील 80 पैकी 8, उत्तराखंडमधील सर्वच्या सर्व 5,

पश्चिम बंगालमधील 42 पैकी 3, जम्मू व काश्मीरमधील 5 पैकी 1, आसाममधील 14 पैकी 5, बिहारमधील 40 पैकी 4, छत्तीसगडमधील 11 पैकी 1, मध्य प्रदेशमधील 29 पैकी 6, अरुणाचलमधील दोन्ही जागा, त्रिपुरातील 2 पैकी 1, मणिपूर व मेघालयमधील प्रत्येकी एक जागा, मिझोराममधील एकमेव जागा, नागालँड व सिक्कीममधील एकमेव जागा, अंदमान व निकोबार, तसेच लक्षद्वीपमधील एकमेव जागेवर यावेळी आपला लोकप्रतिनिधी निवडला जाणार आहे.

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व बिहार ही केवळ तीनच राज्ये अशी आहेत, जेथे निवडणुका सर्वही सात टप्प्यात होणार आहेत. या मोठ्या राज्यांमध्ये सुरक्षा दलांना योग्य प्रकारे तैनात करून शांततामयरीतीने निवडणूक पार पाडणे, हा यामागील मुख्य उद्देश.

जवळपास 970 दशलक्ष प्रौढ पुरुष व महिला देशभरातील 1.2 दशलक्ष मतदान केंद्रांवर आपला बहुमोल हक्क बजावतील. शिवाय, वयस्कर व दिव्यांगांसाठीदेखील खास व्यवस्था करत, अगदी घरोघरी जाऊन त्यांचे मत नोंदवून घेतले जाणार आहे.

निवडणूक आयोगाने नि:पक्षपाती निवडणूक व्हावी, यासाठी विविध राज्य सरकार आणि सुरक्षा पथकांच्या समन्वयाने नेटके नियोजन केले आहे. विशेषत: संवेदनशील मतदार संघांमध्ये तर आणखी काटेकोर दक्षता घेतली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी आणि 20 राष्ट्रीय, तसेच स्थानिक पक्षांची मोट असणारी इंडिया आघाडी यांच्यात ही मुख्य लढत रंगते आहे.

काही स्थानिक पक्षदेखील या निवडणुकीत आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवून देण्यासाठी महत्त्वाकांक्षी आहेत आणि यात प्रामुख्याने पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूमध्ये द्रमुक व अण्णाद्रमुक, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष व बसपा, बिहारमध्ये राजद व जेडीयू, कर्नाटकमध्ये जेडीएस, आंध्रमध्ये वायएसआर, तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती, महाराष्ट्रामधील शिवसेनेचे दोन गट व राष्ट्रवादी, दिल्ली व पंजाबमध्ये आप, पंजाबमध्ये अकाली दल, जम्मू व काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, याशिवाय उत्तर-पूर्वेकडील बर्‍याच स्थानिक पक्षांचा समावेश आहे.

एकीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या करिष्म्याई नेतृत्व व आपल्या दोन वेळच्या सत्ताकार्यातील अष्टपैलू प्रदर्शनाच्या बळावर यंदा 'अब की बार 400 पार'चा नारा दिला आहे, तर दुसरीकडे, मोदींचा हा वारू रोखण्यासाठी कोणताच ठोस मुद्दा नसणार्‍या विरोधकांकडे केवळ मोदींची तिसरी टर्म रोखण्याचा प्रयत्न करणे, इतकाच पर्याय आहे. देशाचे पहिलेवहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1952, 1957 व 1962 च्या सार्वत्रिक निवडणुका सलग जिंकल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती करण्याच्या उंबरठ्यावर आता मोदी पोहोचले आहेत.

यापूर्वी 2019 च्या निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली, तर दुसरीकडे, काँग्रेसला त्यावेळी केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले होते. अगदी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतक्याही जागा त्यांच्या वाट्याला येऊ शकल्या नाहीत.

यंदा रोड शो, निवडणूक रॅली, टीव्ही व रेडिओवरील जाहिराती, तसेच डिजिटल व सोशल मीडियावरील व्यापक प्रचार मोहिमांमुळे पहिल्या टप्प्यात निवडणुका होत असलेल्या 102 मतदार संघातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे आणि हेच चित्र पुढील प्रत्येक टप्प्यात दिसून येत जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात केंद्रीय रस्ता, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नागपूर येथून यंदा हॅट्ट्रिक साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी असतील. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे हे विद्यमान आमदार आपले नशीब आजमावत आहेत.

पारंपरिकदृष्ट्या विचार करता, नागपूर हे देशातील भौगोलिक केंद्र आहे आणि या भौगोलिकतेमुळेच संत्र्यांचे हे शहर भाजपसाठी कठीण ठरत आले आहे. मोदी सरकारमधील सर्वोत्तम कामगिरी साकारणार्‍या नेत्यांपैकी एक असलेल्या गडकरी यांनी भाजपला येथे 2014 व 2019 मधील दोन्ही निवडणुकांमध्ये उत्तम फरकाने येथे विजय संपादन करून दिला आहे. पूर्व विदर्भातील आणखी एक मतदारसंघ असलेल्या चंद्रपूरमध्ये राज्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ही जागा काँग्रेसकडून खेचण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. सहा वेळा आमदारकी भूषवणारे, माजी भाजप राज्य अध्यक्ष मुनगंटीवार येथे काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याविरोधात रिंगणात आहेत.

यापूर्वी 2019 सार्वत्रिक निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर यांनी काँग्रेसतर्फे लढताना भाजपच्या तत्कालीन खासदार हंसराज अहिर यांना धूळ चारली होती.

राजस्थानमधील भाजप उमेदवार, तसेच केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यंदा बिकानेरमधून रिंगणात आहेत. प्रशासनातून राजकारणाकडे मोर्चा वळवणारे मेघवाल तीनवेळा खासदार राहिले असून, यंदा त्यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार गोविंद राम मेघवाल रिंगणात असणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयातील डॉ. जितेंद्र सिंग जम्मूमधील उधमपूर मतदार संघातून सलग तिसर्‍यांदा प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी रिंगणात आहेत. व्यवसायाने डॉक्टर असणारे सिंग यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाब नबी आझाद व त्यानंतर डॉ. करण सिंग यांचे सुपुत्र व जम्मू काश्मीर संस्थानचे शेवटचे राजे महाराजा हरी सिंग यांचे नातू विक्रमादित्य सिंग यांना धूळ चारत एकेकाळी एकच खळबळ उडवून दिली होती. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी या निवडणुकीसाठी बिहारमधील जमाई या आपल्याच मतदार संघातून आपलेच मेहुणे अरुण भारती यांना उतरवले आहे, हे देखील आणखी एक विशेष.

मध्य प्रदेशमधील ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांचे सुपुत्र नकुलनाथ काँग्रेसतर्फे छिंदवाडा मतदार संघातून रिंगणात आहेत. आश्चर्य म्हणजे निवडणुकीला काही महिने बाकी असताना ते भाजपमध्ये दाखल होतील, अशी चर्चा रंगली होती. यापूर्वी 2019 लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमधील 29 पैकी छिंदवाडा या एकमेव मतदार संघात काँग्रेसला विजय मिळवता आला होता, हे देखील येथे उल्लेखनीय.

भाजपने यंदा उत्तर प्रदेशमध्ये पिलीभीत मतदार संघातून वरुण गांधी यांचे तिकीट कापत त्याऐवजी योगी सरकारमधील मंत्री जतीन प्रसाद यांना संधी दिली आहे. तामिळनाडूमधील कोईम्बतूर मतदार संघातून भाजप राज्य अध्यक्ष के. अण्णामलाई हे प्रथमच आपले नशीब आजमावत आहेत. माजी आयपीएस असलेले 39 वर्षीय अण्णामलाई द्रमुक व अण्णाद्रमुक यांच्या द्राविडी राजकारणाचा समूळ नायनाट करण्याच्या उद्देशाने पछाडलेले आहेत. याशिवाय, तामिळनाडूतील निलगिरी येथून मोदी सरकारमधील राज्य मत्स्य मंत्री एल. मुरुगन हे देखील रिंगणात आहेत.

पहिल्या टप्प्यातील आणखी काही मातब्बर उमेदवार : तमिळसाई सुंदरराजन चेन्नई दक्षिण, पॉन राधाकृष्णन कन्याकुमारी, कानिमोझी करुणानिधी थुथूक्कुडी, व्ही. वैथिलिंगम पुद्दुचेरी, संजीव बल्यान मुझफ्फरनगर, जतीन प्रसाद पिलीभीत, मनोज तिग्गा अलिपूरदुआर्स व निशित प्रामाणिक कुचबिहार.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news