Latest

Pankaja Munde : सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी लढू

अविनाश सुतार

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : काय मिळेल याची चिंता नको, सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू, असा आत्मविश्वास भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे  (Pankaja Munde) यांनी गोपीनाथ गडावर आपल्या हजारो समर्थकांसमोर व्यक्त केला. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या की, ओबीसींची सुरक्षितता राहण्यासाठी ओबीसी आरक्षण हवे आहे. शिवराजसिह यांनी दिले, आपण का देऊ शकत नाही, याचा महाराष्ट्र सरकारने विचार केला पाहिजे. मध्यप्रदेशचे अनुकरण केले पाहिजे. सगळेच विचारतात ताई, तुम्हाला काय मिळणार. मला काहीही नको. कोणत्याही पदाची लालसा नाही. मला पराभवाने खूप काही शिकविले. मिळेल ती जबाबदारी आणि संधीचे सोने करुन दाखवू. तुमचा आशिर्वाद कायम ठेवा, अशी साद त्यांनी यावेळी घातली.

पुढे त्या म्हणाल्या की, आताच्या राज्य सरकारमध्ये काय चालले आहे. जात, पात, धर्म यावर राजकारण सुरू आहे. गोपीनाथ मुंडेंनी यापलिकडे जाऊन मानवता धर्म शिकवला आहे. आपण त्या मार्गाने वाटचाल करु. आपले कार्य सत्तेसाठी नाही वंचितासाठी आहे. सत्यासाठी आहे. मुंडे साहेबांच्या विचारासाठी आहे. वंचितासाठी मी कायम उभी राहील, असा निर्धारही पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

वंचित, उपेक्षित घटकांसाठी सतत कार्यरत असणाऱ्या पंकजा मुंडे यांचा लोकांत मिसळण्याचा व साधेपणाची नेहमी चर्चा होते. आज गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे जेवण वाढताना "वाढप्याच्या" रूपात दिसून आल्या.
स्मृतिदिन समारंभाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंडे प्रेमींची अलोट गर्दी झाली होती. रामायणाचार्य ह.भ. प. रामराव महाराज ढोक यांचे यावेळी कीर्तन झाले. कीर्तनानंतर उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सभामंडपामध्ये उपस्थित जनसमुदायाच्या पंगती जेवायला बसल्या आणि या पंक्तीमध्ये पंकजा मुंडे यांनी स्वतः हातात पदार्थ घेऊन पंगतीत वाढायला सुरुवात केली. उपस्थित सर्वांना आग्रहाने खाऊ घालत पंकजाताईंनी स्वतः आपल्या हाताने सर्वांना वाढले. पंकजाताईची ही वाढप्याची भूमिका आजच्या समारंभात लक्षवेधी ठरली.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT