Latest

मोखाडा हत्या प्रकरण : प्रेम प्रकरणातून युवकाने युवतीचा खून करून जीवन संपवले

स्वालिया न. शिकलगार

मोखाडा

प्रेमसंबंधातून तरुणीचा कोयत्याने वार करून खून करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गभालपाडा आश्रमशाळेत १२ वीत शिकणाऱ्या अर्चना उदार (वय १८) या तरुणीची शुक्रवारी (६ ऑक्टोबर) भरदिवसा प्रेमप्रकरणातून धारदार कोयत्याने गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती. यानंतर आरोपी प्रभाकर वाघेरा (वय २२) हा फरार होता. पोलिसाकडून त्याचा शोध सुरु असताना त्याने त्याच्या गावालगत असलेल्या तुळ्याचापाडा डॅमवर पाणी सोडण्यात येणाऱ्या लोखंडी गेटला रात्रीच्या सुमारास गळफास लावून त्याने आपले जीवन संपवले. याबाबतची माहिती मोखाडा पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या –

आश्रमशाळेत वर्गखोल्या कमी असल्याने या आश्रमशाळेपासून ५०० ते ६०० मीटर लांब असलेल्या महाविद्यालयात येथील ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना दररोज चालत नेण्यात येते. अशावेळी शिक्षक या मुलांसोबत असतात. मात्र, काल सकाळी मुली वर्ग संपवून जेवण्यासाठी पुन्हा महाविद्यालयाकडून आश्रमशाळेकडे येत असताना निर्मनुष्य असलेल्या कब्रस्तानाच्या पाठीमागेच प्रभाकर याने अर्चना हिला गाठले आणि धारदार कोयत्याने गळा चिरून हत्या केली. यावेळी तिच्या मैत्रीणीनी घाबरून आरडाओरडा केला. मात्र, काही लोक मदतीला धावण्याआधीच त्याने तिथून पळ काढला.

प्रभाकर वाघरे यांच्या कुटुंबीयांनी अर्चना उदार हिच्याशी लग्न करण्यासाठी मागणी घातली होती. मात्र, उदार कुटुंबीयांनी ती अमान्य करत अर्चनाचा विवाह अन्य ठिकाणी निश्चित केला होता. याबाबत मनात राग धरून त्याने ही हत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मोखाड्यात गुन्हेगारीचा लवलेशही नसताना भरदिवसा तरुणीचा खून होतो, ही घटना वेदनादायी असून या घटनेने आश्रमशाळेतील मुलांचा सुरक्षेचा प्रश्न चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.

SCROLL FOR NEXT