पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त राष्ट्रांमध्ये 'शांततेची संस्कृती' या विषयावर आमसभेची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी काश्मीर, CAA आणि अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून भारताविरोधात भाष्य केले. त्यावर उत्तर देताना संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. प्रत्येक बाबतीत पाकिस्तानचा ट्रॅक रेकॉर्ड संशयास्पद आहे, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. UN
रुचिरा कंबोज म्हणाल्या की, 'या बैठकीत आम्ही शांततेच्या संस्कृतीबद्दल बोलत आहोत. अशा आव्हानात्मक काळात आपले लक्ष विधायक संवादावर असायला हवे. अशा परिस्थितीत आपण एका शिष्टमंडळाच्या (पाकिस्तान) टिप्पण्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. कारण त्यांच्याकडे केवळ शिष्टाचाराचा अभाव नाही. तर प्रत्येक बाबतीत त्यांचा स्वतःचा ट्रॅक रेकॉर्ड संशयास्पद आहे. त्यांच्या विध्वंसक आणि हानीकारक स्वभावामुळे ते आमच्या सामूहिक प्रयत्नांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करत आहेत. आदर आणि मुत्सद्देगिरी या मूलभूत तत्त्वांचे पालन करावे, अशी आमची इच्छा आहे. UN
दहशतवाद शांततेच्या संस्कृतीच्या विरोधात आहे आणि तो करुणा, सहअस्तित्व या धर्माच्या शिकवणीच्या विरोधात आहे. आपल्या देशाचा विश्वास आहे की, संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे आणि संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांनी देखील यावर विश्वास ठेवला पाहिजे. जेणेकरून शांतता संस्कृतीला चालना मिळेल.
कंबोज म्हणाल्या की, जागतिक आव्हाने वाढत आहेत. वाढती असहिष्णुता, भेदभाव आणि धर्मावर आधारित हिंसाचार या आव्हानांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. चर्च, बौद्ध स्थळे, गुरुद्वारा, मशिदी, मंदिरे आणि ज्यू धर्मस्थळांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांबद्दल आम्ही चिंतित आहोत. पाकिस्तानमध्ये दररोज हिंदू मंदिरे आणि गुरुद्वारांवर हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत.
अहिंसेचा मंत्र महात्मा गांधींनी दिला होता आणि तो आजही आपल्या देशाचा आधार आहे. भारत हे केवळ हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्माचे जन्मस्थान नाही. तर इस्लाम, यहुदी, ख्रिश्चन आणि पारशी या धर्मांचाही मजबूत आधार आहे. शोषणाचा सामना करणाऱ्या आणि विविधतेत एकता टिकवून ठेवणाऱ्या सर्व वर्ग आणि धर्मातील लोकांना आश्रय देण्याचा भारताचा इतिहास आहे, असे कंबोज म्हणाल्या.
हेही वाचा