Latest

संतापजनक ! पुण्यातील कोंढव्यात ’पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोंढव्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शाळेचा सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍यासह आणखी एकास अटक करण्यात आली आहे.
अकबर नदाफ आणि तवकीर बिनतोडे (वय 25, दोघेही रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत रोहित कमलाकर शिंदे (31, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दाखल गुन्ह्यानुसार, फिर्यादी कोंढवा बुद्रुक येथील लक्ष्मीनगर येथील गल्ली नंबर 6 येथे राहण्यास आहेत. त्यांच्या येथेच एक इंग्लिश हायस्कूल आहे. तेथे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग चालतात. शाळेमध्ये परिसरातील मुले व मुली शिक्षण घेत आहेत. दि. 14 ऑगस्ट रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास शिंदे हे त्यांच्या घरात असताना त्यांना 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा ऐकू आल्या. त्यांनी लागलीच घराबाहेर येऊन पाहिले असता, इकरा शाळेचा सुरक्षारक्षक अकबर नदाफ आणि त्यांच्याच घरासमोर राहणारा तवकीर बिनतोडे या दोघांनी पुन्हा 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्याचे त्यांनी ऐकले व पाहिले. याबाबत शाळेचे प्राचार्य यांना भेटून रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले. दरम्यान, प्राचार्यांनीदेखील सुरक्षारक्षकाविरोधात यापूर्वी दोन ते तीनवेळा तक्रारी आल्या आहेत, आम्ही त्याला शाळेतून काढून टाकणार आहे, असे शिंदे यांना सांगितले.

दरम्यान, फिर्यादी शिंदे व त्यांच्यासोबत विठ्ठल पंधरकर, भरत नलगे, आदित्य माने व किशोर नलगे यांनी नदाफला 'तू काल पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा का दिल्या? असा जाब विचारला असता, त्या वेळी तवकीर बिनतोडे हादेखील तेथे आला. त्या वेळी त्या दोघांकडे देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल जाब विचारला. याच वेळी कोंढवा परिसरातील स्थानिक कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले. 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा देशविरोधी घोषणा का दिल्या? याचा जाब त्यांनीही विचारला. त्यानंतर काही वेळातच कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे, गुन्हे निरीक्षक संदीप भोसले यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा देशविरोधी घोषणा सार्वजनिकरीत्या दिल्याने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन जातीय दंगल होऊ शकते, याची जाणीव असतानादेखील या दोघांनी घोषणा दिल्या. याप्रकरणी दोघांवरही भादंवि कलम 153, 153 (ए) आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या सर्व विषयाबाबत वरिष्ठ निरीक्षक सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

नागरिकांमध्ये संताप; कारवाईची मागणी
मागील तीन ते चार महिन्यांपासून राज्यात विविध ठिकाणी तपास यंत्रणांनी इसिसची पाळेमुळे खोदून काढण्याचे काम केले आहे. त्यातच महिनाभरात कोंढवा परिसरात अ‍ॅक्टिव्ह झालेल्या दहशतवाद्यांनादेखील तपास यंत्रणांनी शोधून काढले आहे. शहरात दहशतवादी पकडल्याच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली असताना अशा वातावरणात देशविरोधी घोषणा दिल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन याप्रकरणी आरोपींनी केलेल्या कृत्याला विरोध करताना त्यांच्यावर व संबंधित शाळा प्रशासनावर कारवाई करण्याचीही मागणी केली. तसेच शाळेत तिरंगा झेंडा न फडकविल्याचा आरोप करीत नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT