Latest

ENG vs PAK : पाकिस्तान होणार भुईसपाट, इंग्लंड विक्रमाच्या उंबरठ्यावर!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ENGvs PAK Test : कराची कसोटीत पाकिस्तानचा दुसरा डाव 210 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडने 167 धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग आपला विजय निश्चित केला आहे. सामन्याच्या तिस-या दिवसाअखेर इंग्लिश संघाने झटपट सुरुवात केली आणि केवळ 17 षटकांत 2 गडी गमावून 112 धावांपर्यंत मजल मारली. त्यांना विजयासाठी 55 धावांची गरज आहे. बेन डंकेट 50 आणि कर्णधार बेन स्टोक्स 10 धावा करून क्रीजवर असून मंगळवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात ते विजयाची औपचारिकता पूर्ण करून 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला क्लीन स्वीप देतील.

तत्पूर्वी, पाकिस्तानच्या दुस-या डावाला जॅक लीच आणि रेहान अहमद यांनी सुरुंग लावला. सर्वप्रथम, लीचने 6 चेंडूत 3 बळी घेत पाकिस्तानला बॅकफूटवर आणले. यानंतर रेहान अहमदनेही आपल्या फिरकीची जादू दाखवली आणि दिग्गज फलंदाज बाबर आझम (54), सौद शाकिल (53), रिझवान (7) यांना बाद करून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. यादरम्यान, बाबर 2022 मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा चौथा कसोटी फलंदाज ठरला. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रेहानच्या चेंडूवर आक्रमक फटका खेळण्याच्या नादात तो मिड-विकेटवर ओली पोपकडे झेलबाद झाला. (ENGvs PAK Test)

त्याचप्रमाणे, 18 वर्षे आणि 126 दिवसांच्या वयात कसोटी पदार्पण करणारा अहमद इंग्लंडचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने बाबरला बाद केल्यानंतर सलग दोन षटकांत मोहम्मद रिझवान (7) आणि शकील यांना बाद करून सामन्यावरील इंग्लंडची पकड मजबूत केली. अखेरीस आगा सलमान 21, फहीम अश्रफ 1, नौमान अली 16 आणि मोहम्मद वसीम ज्युनियर 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. रेहानने 48 धावांत पाच तर लीचने 72 धावांत तीन बळी घेतले. (ENGvs PAK Test)

दुसऱ्या डावात 167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात दमदार झाली. जॅक क्रॉलीने 41 चेंडूंत 41 धावा केल्या. अबरार अहमदने त्याला पायचित पकडले. क्रॉलीने बेन डंकेटच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. यानंतर रेहान अहमदला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले मात्र तो 10 धावा करून बाद झाला. सध्या बेन डंके (38 चेंडूंत 8 चौकार, नाबाद 50) आणि स्टोक्स 10 धावा करून क्रीजवर आहेत आणि संघाला विजयासाठी फक्त 55 धावांची गरज आहे. (ENGvs PAK Test)

SCROLL FOR NEXT