पुढारी ऑनलाईन डेस्क : PAK vs NZ 2nd Test : न्यूझीलंडचा सलामीवीर ड्वेन कॉनवेने पाकच्या गोलंदाजीची धुलाई करत 2023 सालचे पहिले शतक झळकावले. कराचीच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी कॉनवेने 16 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 191 चेंडूत 122 धावा तडकावल्या. त्याचे हे 12 व्या कसोटीतील हे चौथे शतक ठरले. पहिल्या दिवसाअखेर किवी संघाने 90 षटकांत 6 बाद 309 धावा केल्या. पाकिस्तानकडून आगा सलमानने 3, नसीम शाहने 2 तर अबरार अहमदने 1 विकेट मिळवली.
तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टीम सौदीने टॉस जिंकून पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीवीर टॉम लॅथम आणि ड्वेन कॉनवे यांनी सपाट खेळपट्टीचा फायदा उचलत आश्वासक सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 35.1 षटकांत 134 धावांची भागिदारी रचली. लॅथमच्या रुपाने किवींची पहिली विकेट पडली. त्याने 100 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 71 धावा फटकावल्या. नसीम शाहने लॅथमला पायचित केले. (PAK vs NZ 2nd Test nz devon conway scored the first century of the year 2023)
त्यानंतर कॉनवेने केन विल्यमसनच्या साथीने संघाचा डाव पुढे नेला. एकाबाजूने कॉनवे मोठे शॉट्स खेळत होता, तर दुस-या टोकाला विल्यमसन संयमी फलंदाजी करत राहिला. या जोडीने संघाची धावसंख्या 200 पार नेली. त्यानंतर किवींना दुसरा धक्का बसला. 122 धावा करून कॉनवे माघारी परतला. आगा सलमानने त्याचा अडसर दूर केला. कॉनवे बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 62.2 षटकांत 234 होती. दुस-या विकेटसाठी कॉनवे-विल्यमसन जोडीने 100 धावांची भागिदारी केली. त्यानंतर किवींचा डाव गडगडला. नसीम शहा आणि आगा सलमानने पाकिस्तानला सामन्यात पुनरागमन करून दिले. नसीमने विल्यमसन (36), तर सलमानने डॅरिल मिशेल (3), हेन्री निकोल्स (26) यांना बाद केले. तर अबरार अहमदने ब्रेसवेल (0)ला तंबूत पाठवले. यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या 6 बाद 279 होती. दिवसाअखेर टॉम ब्लंडेलने इश सोधीच्या साथीने 30 धावांची भर घालून धावसंख्या 300 पार पोहचवली. पहिल्या दिवसाअखेर किवींनी 6 बाद 309 धावा केल्या. (PAK vs NZ 2nd Test nz devon conway scored the first century of the year 2023)
सलग दुस-या वर्षी वर्षातील पहिले शतक…
आजपर्यंत कोणताही फलंदाज करू शकलेला नाही असा विक्रम करणारा कॉनवेने जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. कॉनवे हा 2022 मध्ये शतक झळकावणारा पहिला क्रिकेटपटू ठरला होता. त्याचे कसोटी कारकिर्दीतील ते दुसरे शतक होते. बांगलादेशविरुद्ध खेळताना कॉनवेने शतकी खेळी साकारली होती. आता तो 2023 मध्ये पहिले शतक फटकावून सलग दुस-या वर्षी पहिल्या शतकाचा मानकरी बनला आहे. अशी कामगिरी क्रिकेटच्या इतिहासात कुणालाच जमली नव्हती. मात्र आता हा विक्रम कॉनवेच्या नावावर नोंदवला गेला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कॉनवेने 92 धावांची खेळी केली होती. अवघ्या आठ धावांनी त्याला शतकाने हुलकावणी दिली. मात्र दुसऱ्या कसोटीत त्याने पाकिस्तान गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले.
कॉनवेने 21 डावात 1100 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 50 च्या वर आहे. त्याचप्रमाणे त्याच्या नावावर 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 425 धावा आहेत, तर 35 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 1170 धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 99 आहे. (PAK vs NZ 2nd Test nz devon conway scored the first century of the year 2023)
टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, टिम साऊदी (कर्णधार), मॅट हेन्री, एजाज पटेल.
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद, बाबर आझम (कर्णधार), सौद शकील, सर्फराज अहमद (विकेटकीपर), आगा सलमान, हसन अली, नसीम शाह, मीर हमजा, अबरार अहमद.