Latest

४५ कोटी भारतीयांनी नोकरीची आशा सोडून दिली, ही आहेत कारणे!

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारतात नोकरीची आशा सोडून दिलेल्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. बहुतांश लोक योग्य त्या प्रकारची नोकरी मिळत नसल्याने निराश आहेत. त्यामुळे त्यांनी नोकरीची आशा सोडली असल्याची माहिती एका खासगी संस्थेच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

मुंबईतील सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी प्रायव्हेट (CMIE) च्या नवीन आकडेवारीनुसार, ४५ कोटींहून अधिक भारतीयांनी नोकरीची आशा सोडून दिली आहे. रोजगारास पात्र असलेल्या वयोगटातील ९० कोटी भारतीयांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांची मिळून असलेल्या लोकसंख्येएवढ्या भारतीयांना नोकरीत रस नसल्याचे CMIE data मध्ये नमूद करण्यात आले आहे.

२०१७ ते २०२२ या दरम्यानच्या कालावधीत श्रमबळ सहभाग दर ४६ टक्क्यांवरुन ४० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. तसेच सुमारे २.१ कोटी महिलांनी त्यांच्या नोकऱ्या सोडून दिल्या आहेत. तसेच रोजगारास पात्र असलेले कवेळ ९ टक्के लोकच नोकरीच्या शोधात आहेत. नोकरी योग्य वाटत नसल्यामुळे महिलांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे आढळून आले आहे.

"महिला अधिक संख्येने कामगार दलात सामील होत नाहीत. कारण नोकर्‍या त्यांच्यासाठी सहसा अनुकूल नाहीत. उदा. पुरुषांची नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेन बदलण्याची तयारी असते. मात्र, स्त्रियांची तसे करण्यासाठी इच्छा खूप कमी दिसते. हे खूप मोठ्या प्रमाणावर घडत आहे," असे CMIE चे महेश व्यास यांनी म्हटले आहे.

"नोकरीवरुन निर्माण झालेला निरुत्साह असे सूचित करतो की, देशातील तरुण लोकसंख्येचा लाभ भारताला मिळण्याची शक्यता कमी आहे. यामुळे भारत कदाचित मध्यम उत्पन्नाच्या गटातच राहण्याची शक्यता आहे.

मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या २०२० च्या अहवालानुसार, भारताला २०३० पर्यंत कमीत कमी ९ कोटी नवीन बिगरशेती नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी ८ टक्के ते ८.५ टक्के वार्षिक GDP वाढ आवश्यक आहे, असे अहवालात म्हटले आहे.

बेरोजगारीत घट

CMIE च्या आकडेवारीनुसार, भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारीमध्ये ८.१० च्या तुलनेत मार्चमध्ये ७.६० पर्यंत कमी झाला.
जॉब मार्केटच्या नव्या माहितीनुसार, रोजगार भविष्य निर्वाह निधी संघटनने (EPFO) म्हटले की, फेब्रवारीमध्ये १४.२ लाख नवे सदस्य आमच्याशी जोडले गेले आहेत. पे रोल डेटाची महिना दर महिन्याची तुलना केली तर जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये ३१,८२६ नव्या सदस्यांची किंचित वाढ झाल्याचे निदर्शनाचे येत आहे.

कामगार आणि रोजगार मंत्रालायाच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी २०२१ च्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीत १ लाख ७४ हजार ३१४ इतकी रोजगारात वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२१ पासून सातत्याने रोजगारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT