Latest

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर १९ विरोधी पक्षांचा बहिष्कार

मोहन कारंडे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन येत्या 28 तारखेला होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस, राजद, संयुक्त जद, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (युबीटी) या पक्षांसह 19 विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे.

संसद भवन उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचा निर्णय सर्वप्रथम तृणमूल काॅंग्रेसकडून जाहीर करण्यात आला होता. त्यापाठोपाठ अन्य विरोधी पक्षांकडूनही कार्यक्रमास हजर राहणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तमाम विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे ठरविलेले आहे आणि त्यानुसार आम्हीही बहिष्कार टाकत आहोत, असे शिवसेना (युबीटी)  नेते, खा. संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, काॅंग्रेसकडूनही संसद भवन उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे. बहिष्काराच्या अनुषंगाने लवकरच एक संयुक्त निवेदन जारी केले जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. संसद भवनाच्या उद्घाटनास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित न करुन सरकारने त्यांचा घोर अपमान केला आहे. हा देशातील आदिवासी लोकांचाही अपमान आहे, असे आप नेते, खा. संजय सिंग यांनी सांगितले.

लोकसभा व राज्यसभेबरोबर राष्ट्रपती हेही संसदेचे अविभाज्य भाग असतात. अशावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन न करता पंतप्रधानांना हा मान देणे म्हणजे घटनेच्या विरोधात आहे, अशी प्रतिक्रिया भाकप नेते डी. राजा यांनी दिली. काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील संसद भवन उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना न बोलावण्याच्या मुद्यावरुन सरकारची घेराबंदी केली होती.

ज्या दिवशी संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे, त्यादिवशी सावरकर जयंती आहे. या मुद्यावरुनही विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला होता. यंदा त्यांची 140 वी जयंती साजरी केली जाणार आहे. '28 मे रोजी हिंदूत्ववादी विचारक सावरकर यांची जयंती आहे. या दिवशी संसद भवनाचे उद्घाटन करणे हा संयोग आहे की हे सर्व सुनियोजित आहे', अशी टिप्पणी काॅंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे. या दिवशी संसदेचे उद्घाटन करणे हा राष्ट्रनिर्मात्यांचा अपमान आहे. सत्ताधाऱ्यांनी गांधी, नेहरु, पटेल, बोस यांना रद्द केले आहे, त्यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही तिरस्कार असल्याची टीका रमेश यांनी केली आहे.

संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपतींनी करावयास हवे, असे काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 21 मे रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. तेव्हापासून हा वाद वाढत चालला आहे. काॅंग्रेसचे खा. शशी थरुर, आनंद शर्मा, एमआयएमचे खा. असुद्दीन ओवेसी, तृणमूलचे सौगत राय, सुखेंदू राॅय, सुदीप बंडोपाध्याय, राजदचे मनोज झा, माकपचे सीताराम येचुरी यांच्यासोबत अन्य नेत्यांनीही संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्तेच व्हावयास हवे, अशी भूमिका मांडली आहे. दुसरीकडे विरोधकांनी केलेल्या टीकेला भाजपकडून केंद्रीय मंत्री हरदीप पुरी आणि प्रवक्ते गौरव भाटिया यांनी उत्तर दिलेले आहे.

या पक्षांनी घातला बहिष्कार…

ज्या पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, त्यात राजद, संयुक्त जद, तृणमूल काॅंग्रेस, आम आदमी पक्ष, शिवसेना (युबीटी), समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काॅंग्रेस, भाकप, माकप यांचा समावेश आहे.
हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT