Latest

Omicron Variant : प्रवासी नियमावलीअंतर्गत जोखमीच्या देशांची यादी जाहीर

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : 'ओमायक्रॉन' व्हेरियंटच्या (Omicron Variant) पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार 'ओमायक्रॉन'चे रुग्ण आढळलेले देश जोखमीच्या यादीत टाकण्यात आले आहेत. या 'अ‍ॅट रिस्क' देशांतून येणार्‍या प्रवाशांना ते संपूर्ण लसीकृत असले, तरी विमानतळावरच कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका, बोत्सवानासह 12 देशांचा अंतर्भाव जोखमीच्या यादीत करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने नव्या नियमावलीत, ब्रिटनसह युरोपीय संघातील सर्व देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगला देश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायलचा समावेश आहे. (Omicron Variant)

'अ‍ॅट रिस्क' देश सोडून उर्वरित देशांच्या प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी असेल. मात्र, त्यांना 14 दिवसांसाठी 'सेल्फ मॉनिटरिंग' करावी लागेल. उर्वरित देशांतून येणार्‍या प्रवाशांपैकी 5 टक्के लोकांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.
जोखमीच्या देशांतील प्रवाशांना विमानतळाबाहेर जायचे तर 72 तासांपूर्वीचा निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागेल.

पॉझिटिव्ह आढळल्यास आयसोलेट केले जाईल. नमुन्यांची जिनोम सिक्‍वेन्सिंग केली जाईल. निगेटिव्ह आढळलेले प्रवासी घरी जाऊ शकतील; पण त्यांना 7 दिवस आयसोलेट राहावे लागेल. आठव्या दिवशी त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल. पुढे 7 दिवस त्यांना सेल्फ मॉनिटरिंग करावे लागेल. (Omicron Variant)

कोरोनाचा 'ओमायक्रॉन' 13 देशांत दाखल (Omicron Variant)

जीनिव्हा : वृत्तसंस्था : कोरोनाचा 'ओमायक्रॉन' व्हेरियंट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनीसह 13 देशांत दाखल झाला आहे. बहुतांश देशांनी 'ओमायक्रॉन' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध लागू केलेले असतानाही ही स्थिती उद्भवली आहे.

दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नवा व्हेरियंट जगासाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशारा दिला आहे. तथापि, नव्या व्हेरियंटमुळे अद्याप एकाही मृत्यूची पुष्टी झालेली नाही. नवा व्हेरियंट सर्वात आधी बोत्सवानात आढळला. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा या व्हेरियंटची सिक्‍वेन्सिंग करण्यात आली. नंतर तो हाँगकाँग, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, इस्रायल, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल आणि कॅनडात दाखल झालेला आहे. ब्रिटनने 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे.

पोर्तगालमध्ये 13 फुटबॉलपटू बाधित

पोर्तुगालमधील बेलेनिनेसी क्‍लबकडून खेळणार्‍या 13 फुटबॉलपटूंना 'ओमायक्रॉन'ची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

SCROLL FOR NEXT