पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात काेराेनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरवात झाली आहे. ज्यांना परदेश प्रवासाचा इतिहास नाही किंवा परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कातही आलेले नाहीत, अशा ६०० नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) पुण्यातील प्रयोगशाळांनी करण्यात आले. त्यापैकी १२ रुग्णांचे अहवाल ओमायक्रॉनसाठी पॉझिटिव्ह आले आहेत. यावरून पुण्यात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरवात झाली असल्याची पुष्टी आरोग्य विभागाने दिली आहे. (Omicron in pune)
पुण्यातील १२ ओमायक्रॉनबाधित नमुन्यांपैकी ६ नमुने हे गेल्यावर्षी २९ डिसेंबरला पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये पुणे शहर २, पिंपरी चिंचवड ३ आणि पुणे ग्रामीणमध्ये १ असे होते. हे सर्व नमुने पुण्यातील भारतीय विज्ञान व संशोधन संस्थान (आयसर) ने रिपोर्ट केले आहेत.
दरम्यान, रविवार (दि.२) आणखी ६जणांचे अहवाल ओमायक्रॉनसाठी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये पुणे ग्रामीणमध्ये ३, पिंपरी चिंचवडमध्ये २ आणि पुणे शहरातील १ असे नमुने आहेत.
हे अहवाल पुण्याच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात आले, अशी माहिती बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख तथा राज्य जनुकीय क्रमनिर्धारण राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली. केंद्र सरकारने पुणे आणि मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा सामूहिक संसर्ग झाला का, हे पाहण्यासाठी प्रतिदिन मुंबईतून ३०० आणि पुण्यातून १०० नमुने घेण्यास सांगितलेले आहे.
हे सर्व नमुने कोरोनासाठी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांचे आहेत. हे नमुने क्षेत्रीय सर्वेक्षणातून म्हणजेच ज्यांना परदेश प्रवासाचा इतिहास नाही किंवा जे परदेशातून आलेल्या रुग्णांचे घेण्यात आले आहेत.या नमुन्यांची तपासणी बीजे वैद्यकिय महाविद्यालय, आयसर आणि एनसीसीएस या तीन प्रयोगशाळांमध्ये होते.
पुण्यात आतापर्यंत १२ रुग्णांना कोणताही परदेश प्रवास नसताना तसेच ओमाक्रॉनबाधितांच्या संपर्कात आलेले नसताना त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून दिसून आले आहे. त्यावरून मुंबईत तर समूह संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून पुण्यातदेखील ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरवात झाल्याचे दिसून येत आहे.
– आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी
हेही वाचलं का?