Latest

Odisha Train Accident : ‘ओडिशा रेल्वे अपघात षड्यंत्र’ असू शकते; 270 माजी लष्करी, सनदी अधिकारी, न्यायाधीशांचे PM मोदींना पत्र

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : ओडिशा रेल्वे अपघात हे देश विरोधी कृत्य करणाऱ्यांकडून केलेले एक षड्यंत्र असू शकते, अशा आशयाचे एक पत्र देशातील 270 माजी लष्करी अधिकारी, सनदी अधिकारी, न्यायाधीश आदिंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. Odisha Train Accident

ओडिशाच्या बालासोर येथील बहानगा स्थानकावर 2 जून रोजी भीषण असा तिहेरी रेल्वे अपघात झाला. यामध्ये जवळपास 275 लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात कसा घडला यावर देशभरात चर्चा झाली. रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज दिला होता.

तर दुसरीकडे ओडिशामध्ये झालेला हा रेल्वेचा अपघात होता की घातपात अशीही शंका घटनेनंतर व्यक्त करण्यात येत आहे. आता याला माजी अधिकाऱ्यांच्या पत्रामुळे अधिक बळ मिळाले आहे. देशातील 270 माजी लष्करी अधिकारी, न्यायाधीश, नोकरशहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ओडिसा रेल्वे अपघात (Odisha Train Accident) हा देश विरोधी ताकदींकडून केलेला घातपात किंवा षड्यंत्र असू शकते, असे म्हटले आहे. यासाठी त्यांनी 90 च्या दशकात आणि 2000 या वर्षात सुरुवातीच्या काळात रेल्वे ट्रॅकवर घडलेल्या अशा घातपाती कृत्यांमुळे झालेल्या अपघातांचा हवाला त्यांनी दिला.

Odisha Train Accident : अपघातामागे जाणीवपूर्वक केलेली तोडफोड आणि दहशत असू शकते

या सर्वांनी पत्रात रेल्वे रुळालगतची अवैध अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली आहे. माजी डीजीपी विक्रम सिंह आणि माजी डीजीपी एसपी वेद यांनी पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात तोडफोडीपासून सर्व बाबींची चौकशी करण्याचा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान मोदींना पत्रे लिहिणाऱ्या बहुतांश आयएएस/आयपीएस अधिकाऱ्यांनी अशा घटना रोखण्यासाठी योग्य सैन्य तैनात करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच सीबीआयच्या तपासात सर्व काही स्पष्ट होईल, असेही सांगण्यात आले आहे. या अपघातामागे जाणीवपूर्वक केलेली तोडफोड आणि दहशत असू शकते, असे या पत्रात म्हटले आहे.

Odisha Train Accident : माजी नोकरशहांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, माजी रॉ प्रमुख संजीव त्रिपाठी, उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंग, जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एसपी वैद्य, माजी एनआयए संचालक वायसी मोदी, पंजाबचे माजी पोलीस महासंचालक पीसी डोगरा आदिंनी देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

SCROLL FOR NEXT