Latest

Fashion All Time : नऊवारी… कालही आणि आजही…!

दिनेश चोरगे

Fashion All Time : नऊवारी साडी म्हणजे अस्सल मराठमोळा वेश. ग्रामीण भागात लुगडं नावाने ही साडी विशेष प्रसिद्ध आहे. मुख्यत: लाल, पिवळा, निळा, हिरवा, तांबडा, भगवा आणि काळा अशा रंगातही ही साडी मिळते. या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे ऊन, वारा, पावसात शरीराला पर्यावरणीय आवरणासाठी साथ देते. उन्हाळ्यात या साडीमुळे थंडपणा जाणवतो तर हिवाळ्यात हीच साडी ऊब देते. यातील धागे शुद्ध कॉटनचे असल्याने या साडीला थोडा जडपणा आलेला असतो. या साडीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे साध्या पाण्यात धुतली जाते आणि इस्त्री न करताही ही साडी नेसता येते.

मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात नऊवारी साडी (Fashion All Time) नेसण्याची पद्धत आहे. मोठे काठ आणि आतमध्ये प्लेन, एकरंगाची अशी वैशिष्ट्ये असणारी ही साडी आजकाल सर्वांनाच खुणावते आहे. आपल्या कौटुंबिक सोहळा असो किंवा पारंपरिक सण असो, त्यावेळी नऊवारी साडीची आठवण ही येतेच येते. मराठमोळ्या या साडीने हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीनांही वेड लावल्याचे दिसून येते. अगदी अभिनेत्री रेखा, मोसमी चटर्जी या स्टार अभिनेत्रींपासून ते आताच्या मॉडर्न लूक देण्यात धन्य मानणार्‍या कॅटरिना, करिना, प्रियांका, विद्या बालन यांनाही नऊवारी साडी, नथ, आंबाडा आणि केसात गजरा माळून थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. अशी ही नऊवारी आता कॉलेज तरुणी, महिलांमध्येही आवडती होऊ लागली आहे. खास समारंभासाठी नऊवारी नेसवणार्‍यांची चलती आहे. नऊवारी साडी नेसवण्यासाठी काही ब्युटी पार्लरमध्ये ऑर्डरही घेतल्या जातात. म्हणतात ना जुने ते सोने. तसेच नऊवारीचे झाले आहे.

नऊवारीमध्ये (Fashion All Time) वेगवेगळे रंग आढळतात. यामध्ये हिरवा रंग सर्वांच्याच पसंतीचा ठरतो. खास करून पारंपरिक सण किंवा समारंभामध्ये हिरवा रंग शुभ मानला जातो; पण नुसतीच नऊवारी घातली तर त्याला आकर्षक लूक येत नाही. त्याबरोबरच बांगड्या, इयररिंग्ज, गळ्यामध्ये ट्रॅडिशनल ज्वेलरी, कमरपट्टा किंवा मेखला. असा पेहराव म्हणजे सोबर आणि पारंपरिक लूक देणाराचा ठरतो. साडी नेसवण्यासाठी सारखे सारखे ब्युटीशियनला बोलावणे शक्य होत नाही. किंवा आपल्या वेळेत ब्युटीशियन उपलब्ध होईलच असे नाही. याशिवाय ही नऊवारी साडी आवरणेही तसे कठीण जाते. त्यासाठी आता बाजारात तयार साड्याही मिळू लागल्या आहेत. किंवा तुम्ही अशा साड्या शिवूनही घेऊ शकता आणि नऊवारीचा आनंद लुटू शकता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT