बारामती : पुढारी वृत्तसेवा : देशात करिश्मा असणारे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आलेली असून, ती तिसर्या क्रमांकावर येणार आहे. पाच ट्रिलियन डॉलरवर ती नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. आपण जपान व जर्मनीला यामुळे मागे टाकू शकणार आहोत. मोदींएवढे काम करणारा देशात दुसरा कोणताही नेता नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक केले. यापूर्वी मी त्यांच्यावर जरूर टीका केली. परंतु, त्यांच्याएवढे काम अन्य कोणी करू शकत नसल्याचे लक्षात आले आहे, असेही पवार म्हणाले. उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शनिवारी (दि. 26) प्रथमच अजित पवार हे बारामतीत आले. त्यांचा नागरी सत्कार पार पडला, त्या वेळी ते बोलत होते.
त्यांच्या पत्नी सुनेत्रा, पुत्र पार्थ, प्रदीप गारटकर, दिगंबर दुर्गाडे, बाळासाहेब तावरे, पुरुषोत्तम जगताप, प्रशांत काटे, विश्वासराव देवकाते,
सचिन सातव, पोपटराव गावडे, सुनील पवार, दत्तात्रय आवाळे, संभाजी होळकर, जय पाटील, वनिता बनकर, अनिता गायकवाड आदींची उपस्थिती होती. चंद्रयान-3 मोहिमेत विशेष कामगिरी करणार्या वालचंद इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष विकास केसकर यांचा पवार यांच्या हस्ते या वेळी सत्कार पार पडला.
पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था 'टॉप फाइव्ह'मध्ये जाऊन पोहचली आहे. आजवरच्या सर्व पंतप्रधानांनी उत्तम काम केले. परंतु, मोदींच्या नेतृत्वाने विशेष विकासमुद्रा उमटवली, याचा अभिमान आहे. मी यापूर्वी त्यांच्याविरोधात सभा घेत टीका केली. परंतु, पुढे जात काय होणार? याची कल्पना तेव्हा नव्हती. मोदी यांच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनवर जाणार आहे. तेव्हा आम्ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरवर नेऊ. एक ट्रिलियन डॉलर म्हणजे 82.66 लाख कोटी रुपये होतात. त्यामुळे देशाचा जीडीपी वाढणार आहे.
हे लक्ष्य गाठण्यासाठी मी राज्याच्या आर्थिक स्थितीचा सातत्याने आढावा घेतो आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच जपान दौरा केला. त्यांच्या दौर्यामुळे मोठी गुंतवणूक राज्यात होण्यास मदत होणार आहे. मी सत्तेला हपापलेला नाही. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आले नाही. सत्ता येते आणि जाते, मी जनतेची कामे करणारा माणूस आहे. ही कामे अधिक वेगाने मार्गी लागण्यासाठी केंद्राचेही सहकार्य व्हावे, या भावनेने सत्तेत सहभागी झालो आहे. महायुतीच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला अधिक गती देता येणार आहे. पुणे-नगर-नाशिक रेल्वेमार्गाला गती देण्यासाठी मी दिल्लीत मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. विमानतळ, मेट्रो, रस्ते यासाठी विशेष प्रयत्नशील असणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.
मी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतली आहे. माझ्यासह मंत्रिमंडळात राष्ट्रवादीतील विविध घटकांना स्थान मिळेल, याची खबरदारी घेतली. मी कामाचा भोक्ता आहे. राज्यभर फिरावे लागत असल्याने बारामतीला यायला उशीर झाला. मी वेगळी भूमिका का घेतली? हे सांगणे गरजेचे आहे. मोदी हे करिश्मा असणारे नेते आहेत. ते दिवाळीसुद्धा सीमेवरील सैनिकांसोबत साजरी करतात. जगभरात तसेच देशाच्या विविध भागांत फिरून काम करतात. मी हे करीत असताना कोणाचाही अवमान करण्याची माझी भूमिका नाही. मोदी हेच शक्तिशाली नेतृत्व असल्याने मी निर्णय घेतला.
काही जण त्यांच्यावर टीका करतात. परंतु, देशात त्यांच्याएवढे काम करणारा दुसरा कोणी नेता आहे का? हा विचार करा, असेही अजित पवार म्हणाले. साखर कारखान्यांच्या आयकराचा प्रश्न केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यामुळे मार्गी लागला. मी गेली 20 वर्षे याचा पाठपुरावा करीत होतो. त्यासाठी 'यूपीए'मध्ये तीन अर्थमंत्र्यांना भेटलो. परंतु, मार्ग निघाला नव्हता. 2 लाख टन कांदा 24 रुपये 10 पैसे दराने खरेदी करण्याचा निर्णय शेतकर्यांना दिलासा देणारा असल्याचे पवार यांनी सांगितले. प्रास्ताविक जय पाटील, संभाजी होळकर यांनी केले.
सूत्रसंचालनज्ञानेश्वर जगताप यांनी तर आभार अविनाश बांदल यांनी मानले.
मुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादी नेतृत्वावर टीका
2004 ला सर्वाधिक जागा जिंकणार्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळाले असते. परंतु, मला आता काही गोष्टी बोलता येत नाहीत. त्या वेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही विलासराव देशमुख यांना राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपद जाईल, अशी शक्यता व्यक्त केली होती. पण, तसे झाले नाही. मी त्या चर्चेत नव्हतो. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही सहभागी झालो. तेथे शिवसेनेच्या 56 व राष्ट्रवादीच्या 54 जागा होत्या. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मागता आले असते. परंतु, तेथेही ते झाले नाही, अशी खंत बोलून दाखवली. मुख्यमंत्रिपद हुकल्याचा त्यांचा रोख राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर होता.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.