Latest

नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर ‘नो एन्ट्री’ ; जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे आदेश

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉनच्या रूपाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसागणिक बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर नागरिकांही प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे आणि धरणे आदी स्थळे बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

निसर्गाचे कोंदण लाभलेल्या नाशिक जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती मिळत असते. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पर्यटन पुर्वपदावर येत असतानाच तिसऱ्या लाटेचा तडका बसण्यास सुरूवात झाली आहे. पर्यटन स्थळांवर गर्दी न करण्याच्या सुचना धुडकावत पर्यटकांची झुंबड उडत असल्याचे चित्र होते. अखेर जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळे पुन्हा बंद केली आहे.

वीकेण्डसह सुटीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने 'नो एन्ट्री'चा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यटनास्थळापासून एक किलोमीटर परिसरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, पर्यटनस्थळे बंद झाल्यास स्थानिक हॉटेल, रेस्टॉरंट, टॅक्सी व अन्य व्यावसायिकांवर पूर्ण उपासमारीची वेळ येणार आहे. तसेच स्थानिकांच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. सरसकट पर्यटनस्थळ बंद न करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

या पर्यटनस्थळांवर बंदी

ब्रम्हगिरी पर्वत, अंजनेरी पर्वत, दुगारवाडी धबधबा, हरिहर किल्ला, पहिने, साल्हेर किल्ला, भास्कर गड, रामशेज किल्ला, भावली धरण, वैतरणा धरण, गंगापूर धरण परिसर.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पर्यटनस्थळांवरही पर्यटकांची गर्दी होते. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यटनस्थळे बंदीच्या निर्णयाची अमंलबाजवणी १९ जानेवारीपासून सुरू झाली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.

-सुरज मांढरे, जिल्हाधिकारी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT