पुढारी ऑनलाईन : विरोधी पक्षांच्या आघाडीकडून आज पहिल्यांदाच काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेत बोलणार आहेत. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान संसदेतील विरोधी पक्षाच्या बाजूने लोकसभेत ते १२ वाजता बोलण्यास सुरूवात करतील, अशी माहिती लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. दरम्यान खासदारकी बहाल झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच संसद सभागृहात बोलणार आहेत.
लोकसभेत आज सलग दुसऱ्या दिवशी अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. या चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होणार आहेत. तर सत्ताधारी सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी बोलतील, असेही काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी एएनआयशी बोलताना म्हटले आहे की, सत्ताधारी देशाचा, समाजाचा, मणिपूरचा विचार करत नाहीत तर राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला शिव्या देणे हे त्यांचे एकमेव काम आहे. त्यांना दुसरे काही कळत नाही. मोदी आणि त्यांचे सरकार, त्यांचे सहकारी राहुल गांधींना इतके घाबरले आहेत का? मला आश्चर्य वाटते, असेही चौधरी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी माध्यमांशी बोलताना म्हणाले, भाजप देशाचा विचार करत नाही. भाजप समाज आणि मणिपूरचा विचार करत नाही. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला शिव्या कशा द्यायच्या हे भाजपच्या नेत्यांनाच माहीत आहे. मोदी आणि मोदी सरकारचे सर्व लोकप्रतिनिधी राहुल गांधींना इतके का घाबरतात? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.