Latest

NMC News :..तर नाशिक महापालिकेत पुन्हा ३१ प्रभाग

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अध्यादेश अद्याप जारी करण्यात आला नसल्याने प्रभागांची नेमकी संख्या किती राहणार, हे पुरेसे स्पष्ट नसले तरी, जुन्याच प्रभागरचनेतील लोकसंख्येच्या आधारे नाशिक महापालिकेत १२२ नगरसेवकसंख्या कायम राखली गेल्यास पूर्ववत २९ चार सदस्यीय तर २ तीन सदस्यीय अशाप्रकारे ३१ प्रभाग अस्तित्वात येतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, चार सदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय घेण्यात आला असला तरी गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली नाशिक महापालिकेची निवडणूक कधी होणार याविषयीचा निर्णय मात्र अद्याप झालेला नाही.

महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता राज्यातील नाशिकसह अन्य महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती. मुंबईची लोकसंख्या आणि प्रभागांचा आकार लक्षात घेता एक -सदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आली होती. विद्यामान सरकारने पुन्हा प्रभागांच्या संख्येत बदल केला आहे. कोरोना काळात उद्भवलेली आरोग्यविषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिधींनी सरकारसमोर मांडलेली वस्तुस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील समस्या, प्रश्नांचे निराकरण हे प्रभागात सामूहिक प्रतिनिधित्वामुळे म्हणजेच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सुलभ होऊ शकते, याचा विचार करून चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, २००१मध्ये विलासराव देशमुख सरकारच्या काळात बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली होती. तेव्हापासून दर पाच वर्षांनंतर प्रभागांच्या संख्येत बदल करण्यात येत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सन २०१७ मध्ये बहुसदस्यीय म्हणजेच चार सदस्यांची एक प्रभाग पद्धती लागू केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने२०१९मध्ये फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करीत पुन्हा एकदा एकसदस्यीय प्रभाग रचना लागू केली होती. त्यानंतर पुन्हा ठाकरे सरकारनेच सप्टेंबर २०२१ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. कोरोनामुळे महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यानंतर ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेवरून प्रकरण न्यायप्रवीष्ट असल्याने महापालिका निवडणुकांना मुहूर्त मिळालेला नाही.

२९ चार सदस्यीय तर २ तीनसदस्यीय प्रभाग

प्रभागरचने संदर्भातील शासनाचा अध्यादेश प्राप्त झाल्यानंतरच नाशिक महापालिका क्षेत्रात प्रभागांची संख्या किती असेल हे स्पष्ट होऊ शकणार आहे. मात्र जुन्या प्रभागरचनेतील लोकसंख्येच्या आधारे सदस्यसंख्या १२२ कायम राहिल्यास नाशिक महापालिका हद्दीत २९ चार सदस्यीय तर २ तीन सदस्यीय प्रभाग अस्तित्वात येतील. अर्थात प्रभागरचनेत बदल केला जाईल. नवीन लोकसंख्या गृहीत धरून सदस्यसंख्येत वाढ केली गेल्यास प्रभागांच्या संख्येतही वाढ होईल.

निवडणुकांबाबत संभ्रमच

न्यायप्रविष्ठ प्रकरणांमुळे नाशिक महापालिकेची निवडणूक गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे महापालिकेच्या निवडणुकीला २०२५ साल उजाडेल, अशी चर्चा आहे. चार सदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय सरकारने घेतला असला तरी निवडणूक कधी होणार, याविषयी संभ्रम कायम आहे. 

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT