मुंबई; पुढारी ऑनलाईन : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्याच्या मुद्यावरून नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केले आहेत. आरोग्य विमा योजना जेव्हा सुरु केली तेव्हा त्याचे श्रेय तुमच्या पक्षाने घेतले. पण जेव्हा ही योजना बंद झाली आहे, तर मग याचे श्रेय कुणाला द्यायचे? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
आपल्या हस्ते शुभारंभ झालेली योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली. त्यामुळे आता आपणास स्मरण करुन देण्याची वेळ आली आहे. जर ही योजना सुरु करण्याची मानसिकता नसेल तसेच या योजनेचा लाभ कायमचा बंद करण्याचा निर्णय सत्ताधारी पक्षाने घेतला असेल तर त्याची घोषणा करुन टाकावी.
जेणेकरुन कर्मचारी स्वतः विमा काढतील. कर्मचाऱ्यांच्या भावनांशी सत्ताधाऱ्यांनी खेळू नये, असे नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.
'आपले सरकार कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वत:च्याच कौतुकाचे पोवाडे गातात आणि इतकेच नाही तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार कोविड काळातील कामगिरीसाठी 'सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड' प्राप्त करून घेतात.
त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत कोविडमध्ये उत्तम कामगिरी केल्याचे उदाहरण म्हणून 'मुंबई मॉडेल' चीही जगभर वाहवा मिळवून घेतात.
पण जे खरे कोविड वॉरिअर म्हणजे जे महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात.
अशा कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करत आहात? आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पूर्णपणे बंद पाडण्यात आली आहे. हे आपणास माहित नाही का?', असे नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.