Latest

ISIS terrorists : इसिस दहशतवाद्यांचे निपाणी कनेक्शन; आंबोलीच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी

मोहन कारंडे

आंबोली / बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी 'इसिस' या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी निगडित दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी आंबोलीच्या गर्द जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती. तर त्याच्या आधी काही दिवस ते निपाणी आणि संकेश्वर परिसरात वास्तव्यास होते, असे उघडकीस आले आहे. त्यांना आश्रय देणाऱ्यांचीही पुणे पोलिसांनी चौकशी चालवली आहे.

पुणे एटीएसच्या पथकाने मंगळवारी (25 जुलै) आंबोलीच्या जंगलात येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्याठिकाणी काही महत्त्वाचे धागेदोरे या पथकाच्या हाती लागले आहेत, अशी माहिती पथकातील सूत्रांनी दिली. मात्र, या कारवाईबाबत एटीएसच्या अधिकार्‍यांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. हे दहशतवादी तब्बल चार दिवस आंबोलीच्या जंगलातही वास्तव्यास होते.

पुणे-कोथरुड पोलिस स्थानकाचे कर्मचारी प्रदीप चव्हाण, अमोल नाझ हे पेट्रोलिंग करत असताना त्यांनी मोहम्मद इमरान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ अमिर अब्दुल हमिद खान व मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी अशा दोघांना मोटारसायकल चोरीच्या संशयातून ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत हे दोघेही इसिस संघटनेचे दहशतवादी असल्याचे समोर आले. मोहम्मद आलम हा त्यांचा तिसरा साथीदार असून तो पसार आहे. दरम्यान, या दोन्ही दहशतवाद्यांनी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे सांगितले. याबरोबरच कोल्हापूर व सातारा भागातील जंगलातही बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची कबुली त्यांनी दिली.

निपाणी-संकेश्वरात वास्तव्य

मोहम्मद इमरान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ अमिर अब्दुल हमिद खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी व मोहम्मद आलम हे तिघेही बॉम्बस्फोटाच्या चाचणीसाठी पुण्यातून आंबोलीत आले होते. पुणे ते कोल्हापूर-निपाणी-आजरामार्गे आंबोली असा त्यांनी प्रवास केला. या प्रवासादरम्यान ते काही दिवस निपाणी व संकेश्वर येथे वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतही एटीएसच्या पथकाने वरील दोन्ही ठिकाणी या दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या व्यक्तींची चौकशी केली. तसेच दहशतवाद्यांच्या पुणे ते आंबोली दरम्यानच्या प्रवासाचे ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज एटीएसचे कर्मचारी गोळा करत आहेत.

आंबोलीत तपासणी

मंगळवारी (25 जुलै) पुणे एटीएसचे पथक या दोघांनाही घेऊन आंबोलीच्या जंगलात आले होते. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात आले त्या जागेची पथकाने पाहणी केली. स्फोट केलेल्या जागेवरील माती परिक्षणासाठी घेतली. दरम्यान, त्या ठिकाणी अन्य काही साहित्य या पथकाला मिळाल्याचे समजते. दरम्यान, गुरुवार 27 जुलै रोजी पुणे एटीएसने अब्दुल कादीर दस्तगीर पठाण या संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय एटीएसच्या अधिकार्‍यांना आहे.

चौकशीबाबत निपाणीत पोलिस अनभिज्ञ!

निपाणी : पुणे पोलिसांनी 'इसिस' या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या दोघांना अटक केली असून यातील एकजण फरार आहे. या तिघांनी निपाणी आणि संकेश्वर परिसरात वास्तव्य केलेले असल्यामुळे पुणे पोलिसांनी निपाणी परिसरात चौकशी केली आहे. मात्र, या चौकशीची निपाणी पोलिसांनी माहिती दिलेली नाही. पुणे पोलिसांच्या चौकशीबाबत निपाणी पोलिसांशी संपर्क साधला असता, अधिकार्‍यांनी सांगितले की पुणे पोलिस किंवा एटीएसकडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. शिवाय, जरी पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालवला असला तरी, याबाबत पुणे पोलिसांनी निपाणी पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही किंवा तपासासाठी मदतही घेतलेली नाही. दहशतवादविरोध पथक सामान्यपणे स्वतःच चौकशी करते. स्थानिक पोलिसांना ते माहिती देत नाही, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT