Latest

New Jersey earthquake | न्यूजर्सी, न्यूयॉर्क शहर ११ धक्क्यांनी हादरले, २४० वर्षांतील सर्वात मोठा भूकंप (video)

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर आणि आजूबाजूच्या परिसराला भूकंपाचे तब्बल ११ धक्के बसले. शुक्रवारी झालेला हा भूकंप ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. या भूकंपामुळे पूर्व किनारपट्टीवरील इमारती हादरल्या. त्यानंतर स्थानिक वेळेनुसार ५.५९ वाजता न्यूजर्सी येथे ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. युरोपीयन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरच्या (EMSC) माहितीनुसार हा भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात ९ किलोमीटर खोलीवर होता.

न्यूजर्सी येथे शुक्रवारी सकाळी ४.८ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. यामुळे जवळच्या राज्यांतील रहिवाशांना आणि न्यूयॉर्क शहरातील रहिवाशांना याचे हादरे जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप हा गेल्या पाच दशकात या भागात नोंदलेला तिसरा सर्वात मोठा भूकंप होता आणि २४० वर्षांहून अधिक काळातील न्यूजर्सीमधील सर्वात मोठा भूकंप होता.

शुक्रवारी सकाळी १०:२३ वाजता व्हाइटहाऊस स्टेशन, न्यूजर्सीच्या उत्तरेस ५ मैलांवर भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू न्यूयॉर्क शहरापासून सुमारे ४५ मैलांवर होता. येथील रहिवाशांनी फर्निचर आणि मजले हादरल्याचे म्हटले आहे.

सुरुवातीच्या धक्क्याच्या एक तासानंतर, न्यूजर्सीच्या पश्चिमेला बेडमिन्स्टर येथे २ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. दुपारी १२.३० वाजता १.८ तीव्रतेचा, दुपारी १.१४ वाजता २ तीव्रतेचा धक्का बसला. तसेच ३ वाजण्याच्या काही वेळापूर्वी आणखी एक २ तीव्रतेचा धक्का बसल्याची माहिती USGS नी दिली आहे.

या भूकंपाच्या हादऱ्यांनी मोठे नुकसान झाले नसले तरी अभियांत्रिकी पथके रस्ते आणि पुलांची पाहणी करत आहेत.

न्यूजर्सी आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये ४.८ तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर रहिवाशांना हादरवलेला क्षण EarthCam ने कॅमेऱ्यात टिपला आहे. हा व्हिडिओ X वर शेअर करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT