Latest

भारतीय रेल्वेची नवी ‘जनथाळी’; ५० रुपयांत संपूर्ण जेवण

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सामान्य डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना अल्पदरात भोजन मिळावे आणि फेरीवाल्यांकडून प्रवाशांची होणारी आर्थिक लुबाडणूक थांबविण्यासाठी रेल्वेने 'जनथाळी' योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि मुंबई सेंट्रल स्थानकात ही 'जनथाळी' उपलब्ध होणार आहे. २० रुपयांत पुरी-भाजी आणि ५० रुपयांच्या थाळीमध्ये बाटलीबंद पाण्यासह संपूर्ण जेवण प्रवाशांना मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनातर्फे जनरल सीटिंग कोचजवळ प्लॅटफॉर्मवर जेवणाचे काऊंटर लावण्यात येणार आहे. 'आयआरसीटीसी'च्या माध्यमातून रेल्वे कर्मचार्‍यांना स्टॉल उभारून थाळीची विक्री करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाने सर्व क्षेत्रीय रेल्वेला दिल्या आहेत.

या योजनेत प्रवाशांना दोन प्रकारचे जेवण घेता येईल. २० रुपयांत 'इकॉनॉमिकल' आणि ५० रुपयांत 'अफोर्डेबल मिल' अशा स्वरूपात ही 'जनथाळी' असणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनससह मुंबई सेंट्रल, भुसावळ, पुणे, नागपूर, मनमाड, खांडवा या स्थानकांत ही 'जनथाळी' उपलब्ध होणार आहे. 'आयआरसीटीसी'च्या जनआहार केंद्रात तसेच उपाहारगृहात नाश्ता आणि जेवण बनवण्यात येणार आहे. देशातील ६४ रेल्वेस्थानकांत प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी 'जनथाळी' योजना सुरू केली आहे.

स्वस्तात मस्त मेन्यू

२० रुपयांच्या 'इकॉनॉमिकल' थाळीत सात पुर्‍या, बटाट्याची भाजी आणि लोणचे हे पदार्थ असतील, तर ५० रुपयांच्या संपूर्ण जेवणाच्या थाळीत भात-राजमा, छोले-खिचडी, छोले-कुलचे, पाव-भाजी, मसाला डोसा आणि २०० मि.लि. पाण्याची बाटली मिळणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT