नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : भारतासह जगभरात ओमायक्रॉन व्हेरियंट वेगाने पसरत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच केरळसह ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन व्हेरियंटचे ७७ रूग्ण आढळले आहेत. राजधानीत ओमायक्रॉनचे व्हेरियंटचे नवीन चार रूग्ण आढळल्यानंतर एकूण संसर्गग्रस्तांची संख्या १० च्या घरात पोहचली आहे. (omicron varient in india)
यापूर्वी केरळ आणि महाराष्ट्रात नवीन व्हेरियंटचे प्रत्येकी चार रूग्ण आढळले आहेत. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद आरोग्य विभागाने ओमायक्रॉनसंबंधी मेगा सॅम्पलिंग अभियान सुरू केले असल्याचे कळतेय. दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, तेलंगणा तसेच गुजरात सह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत ३२, राजस्थान १७, दिल्ली १०, केरळ ५, गुजरात ४, कर्नाटक ३, तेलंगणा २, आंधप्रदेश, तामिळनाडू, चंदीगढ तसेच पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी १ ओमायक्रॉनबाधित आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील उस्मानाबादमध्ये दोन तसेच मुंबई, बुलढाण्यात प्रत्येकी १ रूग्ण आढळला आहे.
कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन व्हेरियंट पहिल्यांदा २५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २६ नोव्हेंबरला नवीन कोरोना व्हेरियंटला बी.१.१.५२९ नाव दिले. डब्ल्यूएचओने ओमायक्रॉनला 'व्हेरियंट ऑफ कन्सर्न' रूपात वर्गीकृत केले आहे.
जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची धास्ती आहे. याआधी डेल्टा व्हेरियंट वेगाने पसरला होता. डेल्टाचा फुफ्फुसावर होणारा संसर्ग अधिक होता. यामुळे दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण अधिक होते. आता कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिंयंटबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट हवेतून वेगाने पसरतो पण फुफ्फुसाला संसर्ग होण्याचा धोका कमी आहे, असे एका प्राथमिक स्वरुपातील संशोधनातून आढळून आले आहे.
हाँगकाँग विद्यापीठाने जारी केलेल्या एका वृत्तात, अभ्यास करणाऱ्या पथकाचे प्रमुख डॉ. मायकेल चॅन ची-वाई यांनी म्हटले आहे, "मानवांमध्ये रोगाची तीव्रता केवळ विषाणूंच्या प्रतिकृतीद्वारे निश्चित केली जात नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या संक्रमणास दिल्या जाणाऱ्या रोगप्रतिकारक प्रतिसादावर निश्चित केली जाते. संसर्ग हा कधीकधी जीवघेणा ठरतो."
जरी विषाणू कमी संक्रामक असला तरी तो अनेक लोकांना संक्रमित करून एक अतिशय संसर्गजन्य विषाणू ठरू शकतो. तसेच त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो, असेही पुढे चॅन यांनी म्हटले आहे. यामुळे हल्लीच्या अभ्यासांवरुन असे दिसून येते की लस घेतल्यामुळे ओमायक्रॉनचा धोका कमी होऊ शकतो. ओमायक्रॉन पेशींना अधिक घट्ट पकडतो आणि अँटिबॉडिजचा सामना करतो.
दरम्यान, कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनं (Omicron variant) जगभरातील लोकांमध्ये दहशत निर्माण केलीय. या व्हेरियंटच्या धास्तीने अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवासांवर निर्बंध घातलेत. अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केलाय. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी, ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे घाबरण्याचे कारण नसून हा अति सौम्य स्वरुपाचा (super mild) व्हेरियंट असल्याचे म्हटलंय.