पणजी
सामाजिक व इतर नवनवीन विषयांवर चित्रपट तयार झालेले आहेत. गोवन चित्रपट निर्मिती चांगल्या पद्धतीने होत आहे. फक्त हे चित्रपट गोमंतकियांनी आवर्जून पाहणे गरजेचे आहे. (IFFI 2023) तरच गोव्यातील चित्रपट संस्कृतीचा उत्कर्ष अधिक जोमाने होईल, असा विश्वास 'क्रेझी मोगी' या चित्रपटातील नवअभिनेत्री शेफाली नाईक हिने दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला. इफ्फीतील विशेष विभागात निर्माता क्रिस्त सिल्वा यांच्या 'क्रेझी मोगी' या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शन झाले. निवडक सात कोकणी चित्रपट दाखवण्यात आले. त्यात 'क्रेझी मोगी' या चित्रपटाचा समावेश होता. (IFFI 2023)
संबंधित बातम्या –
वळवई-सावईवेरे येथील शेफाली कला अकादमी गोवा कॉलेज ऑफ थिएटर्स आर्टस्च्या अंतिम वर्षात शिकत आहे. वयाच्या तिसर्या वर्षापासून तिने आतापर्यंत २५ हून अधिक नाटकांत काम केले आहे. आतापर्यंत तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तिच्याशी साधलेला संवाद…
सोफिया नावाची भूमिका मी साकारली आहे. सोफिया ही श्रीमंत घराण्यातील मुलगी दाखवली आहे. तिच्यात असलेला स्वार्थीपणा तिच्या नात्यांवर कसा परिणाम करतो हे दाखवण्यात आले आहे. प्रेम हे संपत्ती पाहून होत नसते. ती एक भावना आहे. मात्र याच भावनेला तडा देण्याचे काम सोफियाकडून होते. प्रथमच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद वाटला.
माझी आई रेश्मा नाईक ही नाट्य कलाकार आहे. तिच्यापासून मला प्रेरणा मिळाली. माझे वडील संदीप नाईक हे व्यावसायिक असून त्यांचाही मला खूप पाठिंबा आहे. सावर्डे-कुडचडे येथील प्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी वासंती कारापूरकर ही माझी आजी आहे. आजोबा रामेश्वर शेट हे नाट्यप्रयोगांत संगीत वाद्यवृंदात काम करायचे. त्यामुळे लहानपणापासूनच नाट्यकलेचे बाळकडू मला मिळत गेले. मलाही कला क्षेत्रातच करिअरची आवड असल्यामुळे हे सहज शक्य झाले. माझे शिक्षण जीव्हीएम हायस्कूल, सावईवेरे येथे झाले.
हो, सोफिया ही व्यक्तीरेखा साकारताना खूप कष्ट घ्यावे लागले. सोफिया ही ख्रिश्चन आहे. त्यामुळे ख्रिश्चन समाजात ज्या पद्धतीने भाषा बोलली जाते. ती मी शिकले. माझ्या अनेक मैत्रिणी ख्रिश्चन असल्याने मला त्यांनी खूप सहकार्य केले. मला फक्त सराव करावा लागला.
यासाठी मला सुमारे आठ ते दहा दिवस लागले. निश्चितच ही भूमिका आव्हानात्मक असल्यामुळे दडपण वाढले होते. मात्र नंतर ते सरावाने कमी झाले. एखाद्या गोष्टीची आवड असेल तरच ते सहज शक्य होते. चित्रपटातील एका प्रसंगात फार आव्हान असल्यासारखे वाटले.
ख्रिश्चन नववधूचा पोशाख हा खूप जड असतो. मेकअप करतानाही खूप वेळ लागायचा. मात्र इफ्फीत रेडकार्पेटवर चालताना कष्टाचे सोने झाल्यासारखे वाटले. अजूनही मला या क्षेत्रात पुढे जायचे आहे. थिएटर्समध्ये मास्टर करायचे आहे. आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना पाठिंबा दिल्यास मुलांमध्ये उत्साह, विश्वास वाढतो. मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करू द्या.