Latest

Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंपाने हाहाकार; मृतांची संख्या १२८

निलेश पोतदार

नेपाळ ; पुढारी ऑनलाईन नेपाळ पुन्हा एकदा शक्‍तीशाली भूकंपाने हादरले आहे. नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्‍या या भूकंपात नेपाळमध्ये आतापर्यंत १२८ जणांचा मृत्‍यू झाला आहे. तर अनेक लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबल्‍याने गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या भूकंपाचे धक्‍के देशातील इतर राज्‍यातही बसले आहेत. यामध्ये दिल्‍ली, उत्‍तर प्रदेश, बिहार, उत्‍तराखंडमध्येही भूकंपाचे धक्‍के बसले आहेत. (Nepal Earthquake

नेपाळमध्ये शुक्रवारी (दि.३) उशिरा झालेल्या ६.४ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे मृतांची संख्या १२८ वर पोहोचली आहे, अशी माहिती एका वृत्तसंस्थने दिली आहे.  सरकारी नेपाळ टेलिव्हिजननुसार, पश्चिम नेपाळमधील जाजरकोट आणि रुकुम जिल्ह्यांमध्ये १४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राष्ट्रीय भूकंप मापन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जाजरकोटमधील लामिडांडा भागात होता. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या कार्यालयाने सांगितले की, देशातील तिन्ही सुरक्षा यंत्रणा जखमींना तात्काळ बचाव आणि मदतीसाठी एकत्रित करण्यात आल्या आहेत. काठमांडूपासून पश्चिमेला सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या जाजरकोट येथील रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.

Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप सामान्य

नेपाळमध्ये भूकंप सामान्य आहेत. ३ ऑक्टोबर रोजी, भूकंपांची मालिका, सर्वात शक्तिशाली ६.२ तीव्रतेचा झालेला. यावेळी नेपाळला एकापाठोपाठ एक धक्के बसले आणि दिल्ली-एनसीआर क्षेत्रासह उत्तर भारतातील काही भागांमध्ये हादरे बसले होते. एक वर्षापूर्वी, नोव्हेंबर २०२२ मध्ये, डोटी जिल्ह्यात ६.३ तीव्रतेच्या भूकंपात सहा जणांचा मृत्यू झाला होता. देशाला हादरवून सोडणाऱ्या भूकंपांच्या मालिकेपैकी हा एक होता. २०१५  मध्ये ७.८ तीव्रतेच्या भूकंपात १२,००० हून अधिक लोक मृत झालेले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT