Latest

NDA Meeting : रालोआ घटक पक्षांच्या उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष; महाराष्ट्रातून शिंदे, अजित पवार गट उपस्थित राहणार

मोहन कारंडे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे विरोधी आघाडीची बंगळुरूमध्ये बैठक पार पडत असताना दुसरीकडे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मंगळवारी (दि.१७) दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्यमान घटक पक्षांसोबतच रालोआत नव्याने सामील झालेल्या पक्षांना बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी राहिला असल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही आघाड्यांच्या बैठकीत आगामी रणनीती निश्चित केली जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बैठकीत प्रामुख्याने मार्गदर्शन करणार असल्याचे समजते. अलिकडील काळात रालोआमध्ये जे घटक पक्ष सामील झाले आहेत, त्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट, शिवसेनेचा शिंदे गट, उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारत समाज पार्टी यांचा समावेश आहे. हे पक्ष बैठकीस हजर राहणार आहेत. बिहारमधील लोकजनशक्ती पार्टीलाही निमंत्रण देण्यात आलेले आहे.

पंजाबमधील शिरोमणी अकाली दल तसेच आंध्र प्रदेशातील तेलगू देसम पार्टी रालोआच्या बैठकीला हजर राहतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र वारंवारच्या चर्चेनंतरही भाजपसोबतचे या पक्षांचे मतभेद मिटलेले नाहीत.

रालोआ बैठकीसाठी ज्या प्रमुख पक्षांना निमंत्रण पाठविण्यात आले आहेत, त्यात लोकसमता पार्टी, हिंदुस्थान अवाम मोर्चा, निषाद पार्टी, अपना दल सोनेलाल गट, जननायक जनता पक्ष, पवन कल्याण यांची जनसेना, अण्णा द्रमुक, तामिळ मनिला काँग्रेस, इंडियन मक्कल कलवी मुनेत्र कझगम, कोनराड संगमा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, सिक्कीममधील एसकेएफ, जोरमथंगा यांचा मिझो नॅशनल फ्रंट, आसाम गण परिषद आदी पक्षांचा समावेश आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT