Latest

जयंत पाटील यांची ‘ईडी’ चौकशी; विट्यात राष्‍ट्रवादीचे आंदोलन

निलेश पोतदार

विटा : पुढारी वृत्तसेवा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर थांबवा अन्यथा येत्या निवडणुकीत जनताच तुम्‍हाला धडा शिकवेल अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. आज (सोमवार) राष्‍ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्‍यानुसार जयंत पाटील हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. यानंतर याचे पडसाद विट्यात देखील उमटले. विट्यातील राष्‍ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी ईडीकडून जयंत पाटील यांच्या विरोधात खोटी कारवाई करण्यात येत असल्‍याचे म्‍हणत राष्‍ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले. त्यांना पाठींबा म्हणून सध्या राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलने सुरू आहेत. विट्यातही मुख्य चौकात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हातात फलक, काळेझेंडे घेऊन आंदोलन करण्यात आले. दिवाळी खोरीत निघालेल्या आय एलएफएस कंपनीच्या व्यवहारांची 'ईडी'कडून चौकशी सुरू आहे. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. या प्रकरणी ईडीने चौकशीसाठी जयंत पाटील यांना बोलावले आहे. या आधीही याच कंपनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांचीही चौकशी झाली आहे. याबाबत बाबासाहेब मुळीक म्हणाले, लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष आणि त्यांच्या अभिव्यक्तीला महत्त्व आहे. पण आज देशात विशेषतः बिगर भाजपशासित राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर होत आहे. ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी करत आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांना १३ महिने तुरुंगात ठेवण्यात आलं. मात्र चौकशीत हे सत्य नसल्याचे निष्पन्न झाले. माजी मंत्री नवाब मलिक यांनाही अशाच खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबलं आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली. ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. यंत्रणांचा हा गैरवापर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच नाही तर अन्य विरोधी पक्षातील नेत्यांबाबतही सुरू आहे. साम, दाम, दंड, भेद कोणत्याही मार्गे सत्ता मिळवण्यासाठी बिगर भाजप राज्या त भाजपचे सुरू असलेले उद्योग संपूर्ण देशाने पाहिले आहेत. फोडाफोडीचे राजकारण करून आणि आमदार पळवून राज्यांमधील सरकार पाडण्याचे असत्याचे प्रयोग सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यात तर आता खोके सरकार अशीच सध्याच्या सरकारची ओळख झाली आहे. त्यामुळे असले प्रकार वेळीच थांबविले नाहीत तर जनताच तुम्हाला धडा शिकवेल असेही मुळीक म्हणाले.

विधानसभा क्षेत्राधिकारी सुशांत देवकर म्हणाले, विरोधकांना संपवि ण्याचे असे विध्वंसात्मक राजकारण देशाच्या व राज्याच्या हिताचे नाही. कर्नाटकातल्या निवडणुकीत अशा राजकारणाला जनतेने नाकारल्याचे दिसले आहे. हेच चित्र आगामी काळात देशात व महाराष्ट्रातही दिसेल, विरोधकांवर सुरू असलेल्या दबावतंत्राला लोकशाही मार्गाने विरोध करणे हे निरोगी लोकशाही करिता आवश्यक आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधानकर्त्यांना अपेक्षित लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी आमचे हे आंदोलन आहे.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, तालुका युवक अध्यक्ष हर्षल बागल, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, किसनराव जानकर, हरिभाऊ माने, अविनाश चोथे, मनोहर चव्हाण, सचिन शितोळे, प्रशांत कांबळे, पूनम महापुरे, लता मेटकरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT