Latest

तासगाव : निवडणूक आयोगाचाच दर्जा तपासण्याची गरज : रोहित पाटील

निलेश पोतदार

तासगाव : पुढारी वृत्तसेवा अलिकडच्या काळात निवडणूक आयोग ज्या पद्धतीने कारवाई करत आहे किंवा निर्णय घेत आहे, ते पाहून निवडणूक आयोगाचाच दर्जा तपासण्याची गरज आहे का काय? असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारु लागलेले आहेत, असे टिकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहित पाटील यांनी सोडले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा रद्द केला, याबाबत प्रतिक्रिया देताना रोहित पाटील बोलत होते.

रोहित पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सत्ता असताना राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. निर्णयांचे राज्यातील जनतेने नेहमीच स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला असला, तरी लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी निश्चितपणाने आहे.

राष्ट्रवादी तळागाळापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. सूडबुद्धीने कारवाई करताना जे निर्णय घेतले जात आहेत, त्याला राज्यातील जनताच उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा कागदपत्रांची तपासणी करून घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा.
अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी द्राक्ष बागा पडलेल्या आहेत, तर कुठे बेदाणा भिजला आहे. सरकारने तातडीने अवकाळीचे पंचनामे सुरु केले पाहिजेत. परंतू आज कुठेही पंचनामे होत नाहीत. अशा तक्रारी शेतकरी करत आहेत. पंचनामेच होणार नसतील, तर सरकार कुठल्या निकषावरती अनुदान देणार आहे, याचेही उत्तर मंत्र्यांनी द्यावे.

मुख्यमंत्र्यांनी जनतेला वेठीस धरु नये

रोहित पाटील म्हणाले, अयोध्येला जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम कुठल्याही मंत्र्याने किंवा मुख्यमंत्री यांनी करू नये. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले, त्या पद्धतीने त्वरित पंचनामे, अनुदान वाटप या सगळ्या बाबतीत सरकारने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT