Latest

NCP Dispute: राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आयोगाकडे आणली ट्रकभर कागदपत्रे

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली ;पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हावर आपलाच हक्क असल्याचा दावा करणाऱ्या शरद पवार गटातर्फे आज निवडणूक आयोगाकडे शब्दशः ट्रकभर दस्तावेज सादर करण्यात आले. यामध्ये प्रतिज्ञापत्रे, काही पुस्तके आणि अन्य कागदपत्रांचा देखील समावेश आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला होणार आहे. (NCP Dispute)

राष्ट्रवादी काँग्रेसवरील ताबा मिळविण्यासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील कायदेशीर लढाई निवडणूक आयोगासमोर सुरू झाली आहे. मागील सुनावणी ९ ऑक्टोबरला झाली होती. त्यावेळी आयोगाने शरद पवार गटाला ३० ऑक्टोबरपर्यंत आपले दस्तावेज सादर करण्यास सांगितले होते. त्याअनुषंगाने खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगात येऊन ही कागदपत्रे दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दस्तावेज भरलेला ट्रकच निवडणूक आयोगासमोर आणला होता. आकारामुळे ट्रक आयोगाच्या प्रवेशद्वारात शिरू शकला नाही. अखेर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांद्वारे हे सर्व दस्तावेज आत नेण्यात आले. (NCP Dispute)

राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ताबा शरद पवार गटाचा की अजित पवार गटाचा या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर ९ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने शरद पवार यांच्यावर एकाधिकारशाही पद्धतीने पक्षाचा कारभार चालविल्याचा आरोप केला होता.
पक्षांतर्गत लोकशाही नसून शरद पवार यांनी घर चालविल्याप्रमाणे पक्षाचे कामकाज केले, असा ठपका अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान ठेवला होता. त्यावेळी तातडीने सुनावणी घेण्याचाही आग्रह अजित पवार गटाने धरला होता. मात्र तो नाकारताना निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ३० ऑक्टोबरपर्यंत दस्तावेज सादर करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार आज पवार गटातर्फे दस्तावेज सादर करण्यात आले. या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता शरद पवार गटातर्फे ९ नोव्हेंबरला युक्तिवाद केला जाईल. (NCP Dispute)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT