Latest

Navratri 2023 Kalratri : दुर्गामातेचे आठवे रूप – महागौरी

अनुराधा कोरवी

श्वेते वृषे समारूढ श्वेताम्बरधरा शुचिः । महागौरी शुभं ददयान्महादेवप्रमोदया ।।

दुर्गामातेचे आठवे रूप म्हणजे 'महागौरी' होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुवून जातात. भविष्यात पाप-संताप, दुःख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णतः गोरा आहे. या गोऱ्यापणाची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. ( Navratri 2023 Kalratri )

तिचे वस्त्र आणि आभूषणंदेखील श्वेत रंगाची आहेत. महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.

आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने अंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. तिच्या कृपेमुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे. ( Navratri 2023 Kalratri )

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT