Latest

Nashik Trimbakeshwar : कुशावर्तावर चोरट्यांची ‘हाथ की सफाई’, कपडे सुद्दा सोडत नाहीत

गणेश सोनवणे

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा, पितृपक्षाच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी कुशार्वतावर राज्यभरातून आलेल्या भाविकांचे माेबाइल, पैशाचे पाकीट, एटीएमवर डल्ला मारत आहेत. मुंबईतील सहायक पोलिस उपनिरीक्षकांनासुद्धा चोरट्यांनी दणका देत त्यांचा मोबाइल आणि आठ हजार रुपये लंपास केले.

कुशावर्तावर सध्या पहाटे 5 पासून दुपारी 12 पर्यंत धार्मिक विधीसाठी भाविकांचा राबता आहे. शहरात एका वेळी सुमारे १० हजार धार्मिक विधी सुरू असतात. विधीला जाण्यापूर्वी आणि विधीनंतर असे दोनदा स्नानासाठी आलेल्या भाविकांची संख्या सुमारे 40 हजारांहून अधिक असते. या गर्दीचा फायदा भुरटे चोर घेत आहेत. दररोज चोऱ्या होत असल्या, तरी बरेच भाविक पोलिसांकडे तक्रार नोंदवत नाहीत. त्यामुळे चोरीचे प्रमाण खूपच अधिक आहे.

रविवारी (दि. 8) मुंबई सहारा विमानतळावर नोकरीस असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक धनाजी पाटोळे (५७) कुशावर्तावर पहाटे 5.30 ला स्नानासाठी आले होते. ते स्नान करत असताना त्यांचा 10 हजारांचा मोबाइल, ॲक्सिस बँकेचे एटीएम कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड तसेच आठ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली. दिनेश दलाल या अन्य भाविकाचे २५०० रुपये असलेले पाकीट चोरीस गेले. रूपेश दलाल यांची १५ हजार रुपये रोख रक्कम, मोबाइलही चोरीस गेला. तसेच आकाश राऊत यांची ९ हजारांची रोख रक्कम, वाहनचालक परवाना, एटीएम कार्ड आणि मोबाइल लंपास करण्यात आला. गर्दीचा फायदा घेत एकाच वेळेस चोरट्यांनी सुमारे ६४ हजारांचे विविध मोबाइल व रोकड चोरल्याचे त्र्यंबक पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या तक्रारींवरून उघड झाले आहे.

कपडे चोरीला, भाविक अंडरपॅंटवर

स्नानासाठी कुशावर्तात उतरलेल्या भाविकांचे कपडे चोरटे उचलून नेतात. त्यामध्ये असलेले पाकीट व रोकड काढून कपडे जवळपासच्या परिसरात फेकून दिले जातात. काही वेळेस अक्षरश: अंडरपॅंटवर भाविकांना मुक्कामाच्या खोलीकडे जावे लागते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT