लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून कांद्यानंतर टोमॅटो दराला उतरती कळा लागली असून टोमॅटोचे भाव गडगडल्याने कुठले पीक घ्यावे, अशा चिंतेत शेतकरी वर्ग सापडला आहे. शेतीमधून कुठलेही शाश्वत उत्पन्न मिळत नसल्याने सणासुदीला पैशाची तजवीज कशी करावी, अशी चिंता बळीराजाला पडली आहे. आज येथील बाजार समितीत टॉमेटोची १९ हजार ३६७ क्रेट्स आवक होऊन क्रेट्स कमाल ३० रुपये, कमाल १४१ तर सरासरी १११ रुपये दर मिळाला.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने टँकरच्या साह्याने टोमॅटोला पाणी देत उत्पादन घेतले. आजच्या दरामध्ये उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक निघणे मुश्किल झाल्याने शेती जिकरीची झाली आहे. टोमॅटोचे भाव दोन महिन्यापूर्वी गगनाला भिडले होते. त्यावेळी सरकारने नेपाळ व इतर देशातुन टोमॅटो आयात करत किरकोळ बाजारात भाव स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले होते. आता टोमॅटोचे भाव पडले, पण शासन आता भाववाढीसाठी प्रयत्न करताना दिसत नसल्याची संतप्त शेतकरी व्यक्त करत आहेत.
टोमॅटोचे भाव पडले असल्याने केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. आज जो भाव मिळत आहे त्यातून शेतकऱ्यांना माल विकण्याचे पैसे देखील निघत नाही. त्यामुळे सरकारने हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी शेखर कदम यांनी केली आहे.
हेही वाचा :