Latest

नाशिक : छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर होणार तीन उड्डाणपूल; आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नांना यश

अंजली राऊत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील छत्रपती संभाजी महाराज रस्त्यावर होणाऱ्या अपघातांच्या सातत्याच्या घटना अन् नेहमीची वाहतूक कोंडी या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी चौक (मिर्ची चौक) , जुना वड बस थांबा चौक आणि नांदुर नाका याप्रमाणे तीन उड्डाणपूल मंजुर झाले आहेत. लवकरच टेंडर काढून बांधकामाला सुरुवात देखील होणार आहे. आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नाने पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा छत्रपती संभाजी महाराज रस्ता गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटना अन् सततची वाहतूक कोंडी यामुळे चर्चेत आलेला आहे. हॉटेल मिरची चौकात अपघातग्रस्त खाजगी बस पेटून अनेक निरपराध प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यु झाला. त्यापुर्वी देखील तेथे वारंवार अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. जुना वड बस थांबा आणि नांदूर नाका येथेही वाहनांची कायम वर्दळ सुरू असते. शिवाय आजूबाजूला शॉपिंग कॉम्पलेक्स, छोटे मोठे दुकानदार, व्यावसायिक आहे. परिणामी सतत वाहनांचा वावर असतो. शिवाय या तीनही चौकाच्या जवळपास अंदाजे पंधरा मंगल कार्यालये असून विवाहदिनी दाट गर्दी असल्यामुळे येथील वाहनाच्या संख्येत भर पडते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या समस्येतून ठोस मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांकडून सतत केली जात होती. आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नाने आता येथे तीन उड्डाणपूल मंजुर झाले आहेत. त्यामुळे भविष्यात येथील अपघातांच्या घटनेवर नियंत्रण मिळून वाहतूक कोंडी देखील सुरळीत होईल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

येथे होणार तीन उड्डाणपूल 

राष्ट्रसंत स्वामी जनार्दन चौक, जुना वड बस थांबा आणि नांदूर नाका येथे तीन उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. यासाठी ५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता काम कधी सुरू होईल, अशी प्रतिक्षा सामान्य नागरीकांना लागुन आहे.

अखंड उड्डाणपूल नाही 

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मठ ते नांदुर नाका असा थेट उड्डाणपूल करावा, अशी चर्चा केली जात होती. मात्र तीन ठिकाणी असणारे चौक, दुतर्फा वाढत असलेली रहिवाशी वसाहत , मंगल कार्यालये, व्यावसायिक, नागरिकांची अखंड उड्डाणपूलामुळे मोठी गैरसोय निर्माण झाली असती. या समस्याविषयी आमदार राहुल ढिकले यांनी दखल घेत यामुळे येथे तीन उड्डाणपूल मंजुर केले आहे.

राष्ट्रसंत स्वामी जनार्दन चौकात (मिर्ची चौक) झालेला बसचा अपघात अन् त्यात हकनाक बळी गेलेले प्रवाशी यामुळे येथील छत्रपती संभाजी महाराज रस्ता राज्यभर चर्चेत आला होता. घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भेट दिली होती. मिरची हॉटेल चौकाप्रमाणे धोकेदायक , अपघाताला कारणीभूत असणारे जुना वड बस थांबा आणि नांदूर नाका चौकांचा देखील विषय प्रलंबित होता. यावर उड्डाणपूल हाच ठोस उपाय होता. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करून तीन उड्डाणपूल मंजुर केले. लवकरच टेंडर काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. – राहुल ढिकले, आमदार.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT