Latest

नाशिक : जलसमृद्ध अभियानाची मुहूर्तमेढ रोवत जिल्ह्यातील गाळमुक्त धरणांसाठी संघटनांची वज्रमुठ

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सुजलाम, सुफलाम जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत आता पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष बहावयास मिळत आहे. सर्वाधिक धरणांचा जिल्हा असतानाही नाशिकवर ही परिस्थिती ओढावण्यामागे मुख्य कारण धरणांसह, नद्या, नाले, तलाव या प्रमुख जलस्त्रोतांमध्ये साचलेला गाळ. भविष्यात पाण्याच्या भीषणतेला गाळ मुख्य कारण ठरण्याची शक्यता असल्याने, जिल्ह्यातील सर्वच प्रमुख संघटनांनी एकत्र येत जलसमृद्ध अभियानाची मुहूर्तमेढ रोवत १५ एप्रिलपासून गाळमुक्त धरणांसाठी वज्रमुठ बांधली आहे.

सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट सभागृहात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, मृदा व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक अधिकारी हरिभाऊ गीते, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील सर्व प्रमुख उद्योजक, बिल्डर्स, व्यापारी, व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा यांनी जलसमृद्ध अभियानाची घोषणा करताना जिल्ह्यातील सर्व प्रमुख जलस्त्रोतांचा श्वास मोकळा करण्यासाठी प्रत्येकाने अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. गंगापूरसह इतर जलाशयांची क्षमता कशी वाढविता येईल, यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. प्रत्येकाने आपआपल्यापरीने सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. अभियानाचा प्रारंभ गंगापूर धरणाजवळील गंगावरे गाव येथे सकाळी ८ वाजता होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जि. प. सीईओ आशिमा मित्तल यांनी, 'जिल्ह्यातील नांदगाव, येवला, चांदवड, बागलाण, मालेगाव, सिन्नर, देवळा, इगतपूरी या तालुक्यांमध्ये दरवर्षीच्या तुलनेत आतापासूनच टँकरची संख्या वाढविण्यात आली आहे. ही बाब नक्कीच चिंतेची असून, जलाशयांमधील गाळ उपसा केल्यास, पुढील वर्षी पाणी क्षमता वाढविणे शक्य होईल असे सांगितले. तसेच प्रशासनाच्यावतीने परवानग्यांबाबतची आवश्यक मदत केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उपस्थितांनी सूचना मांडल्या तसेच अभियानासाठी मदतीचे आश्वासन दिले. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, नरेडकोचे जयेश ठक्कर, हेंमत राठी, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, निवृत्ती कापसे, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे, डॉ. राहुल रनाळकर, अभिजित कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू साखला यांनी केले.

यांनी मांडल्या सूचना
आर्ट ऑफ लिव्हिंगचे विजय हाके, नरेडको अध्यक्ष सुनील गवादे, क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल पाटील, रेनबो फाऊंडेशनचे प्रशांत परदेशी, राह फाऊंडेशनचे ऋषीकेश पाटील, विजयश्री संस्थेचे मनोज साठे, उद्योजक रमेश वैश्य, सचिन वैद्य, अंबरिश मोरे, राजू गुप्ता, पुढारीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे, टॅक्स प्रॅक्टीसनर्स असोसिएशनचे अक्षय सोनजे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी अभियानाबाबत विविध सूचना मांडल्या.

दिवसाला ५० लाख लीटर क्षमता वाढणार
गंगापूर धरणात दिवसाला ५० लाख लीटर क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून १५ एप्रिल ते १५ जून असे ६० दिवस अभियान राबविले जाणार आहे. सुरुवातीला याठिकाणी दररोज पाच फोकलॅण्ड मशीन कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. एका मशीन १० तास सुरू ठेवल्यास, त्या मशिनच्या माध्यमातून एक हजार क्युबीक मीटर गाळ काढून १० लाख लीटर पाणी क्षमता वाढविली जाईल. अशा पाच मशीनच्या माध्यमातून ५० लाख लीटर पाण्याची दररोज क्षमता वाढविण्यात येणार आहे. अभियानाने गती पकडल्यानंतर मशीनची संख्या आणखी वाढविण्यात येईल.

बैठकीत आलेल्या सुचना अशा
-धरण गाळमुक्तीची जलचळवळ व्हावी यासाठी एक रुपयांपासून पुढे अर्थसहाय्य घ्यावे.
– गाळ उपसा करताना बाधा येऊ नये, यासाठी पोलिसांची मदत घ्यावी.
– जलशयाच्या किनाऱ्यांवर जाड सालीच्या वृक्ष लागवडीसाठी वन विभागाची मदत घ्यावी.
– प्रशासनाने हायवा, ट्रॅक्टरला रॉयल्टी आकारू नये.
– पाणी क्षमता वाढविण्याबरोबरच प्रशासनाने बचतीचा संदेश नाशिककरांपर्यंत पोहोचवावा.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT